Saturday, May 28, 2011

संध्याबाई

-- " तुम्ही वरच्या मजल्यावर राहायला आलात काय??? " एक ५०-५५ वयाच्या डोळ्याला चष्मा असणाऱ्या बाई आम्हाला विचारात होत्या . त्यावेळी आम्ही आमच्या दरवाज्याच्या कुलुपाची चावी तिघांपैकी कोणाकडे आहे ? ह्यावर भांडत होतो .त्या बाईंच्या प्रश्नाने आम्ही शांत झालो .
-- " हो परवाच आलो राहायला " आनंद त्या बाईंना म्हणाला.
-- "हो का? .... आपलं नाव कसं ?
-- " मी आनंद , हा मकरंद . आणि हा उमाकांत" आनंद ने आमची पण ओळख करून दिली . मी आणि उम्याने त्यांना हसून नमस्कार केला .
-- तुम्ही कॉलेज मध्ये आहात कि कसं ?
-- नाही , आम्ही जॉब करतो ...
-- तिघेही??
-- हो
-- कुठे ??
-- FDA
-- FDA ?? हि कोणती कंपनी ?? , त्या बाईंची प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली ...मला तर असा कंटाळा आला होता ... मनात आलं कि त्या बाईंना सरळ सांगावं कि , 'ओ , बाई तुमचा आणि आमचा कसलाही संबध या पूर्वी नव्हता.... आणि पुढेही येणार नाही ...का उगाच डोकं खाताय??' पण मला तेव्हा काय माहित होतं कि माझं हे विचार करणं किती फोल होतं ते...
-- कंपनी नाहीं... महाराष्ट्र शासन .... आनंद च्या उत्तराने मी भानावर आलो .' महाराष्ट्र शासन' हा शब्द ऐकल्यावर
त्या बाईंनी त्यांच्या चष्म्यापेक्षा मोठे डोळे केले .
-- अरे वा !! म्हणजे गव्हर्मेंट मध्ये का??
-- हो ...
आम्ही गव्हर्मेंट मध्ये काम करतो हे कळल्यावर त्या बाईंच्या डोळ्यात आमच्याविषयी आदर आणि आश्चर्य ह्यांचं मिश्रण दिसलं.
-- काय हो ? कसे काय लागलात गव्हर्मेंट मध्ये??... ह्या विचारण्यामागे त्या बाईंचा वेगळाच उद्देश दिसला.
-- "department ची परीक्षा होती ती पास झालो, त्यानंतर interview ., आणि मग आमची निवड झाली " .उम्या म्हणाला , त्यालाही कदाचित त्या बाईंनी विचारलेल्या प्रश्नाचा रोख कळला असावा. .
--" ओ ... अच्छा .. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला होतात तर... ... इथे कोणत्या पदावर आहात??... " ह्या बाई तर आमच्या तिघांचीही कुंडली काढायच्या विचारात दिसत होत्या . त्या सर्व प्रश्न आनंद लाच विचारात होत्या , ते एक बरं होतं .आम्ही आपले मागे हाताची घडी घालून उभे होतो आणि जाम वैतागलो होतो. पण मधेच त्या बाई आमच्याकडेही पाहत होत्या त्यामुळे उगाचच खोटं खोटं हसायला लागत होतं.
-- मी आणि उमाकांत वरिष्ठ लिपिक आहोत आणि मकरंद कनिष्ठ लिपिक.... आनंद ने आमच्या पदांचीही नावे सांगितली ... प्रथमच मला ह्या सर्वांपेक्षा कनिष्ठ असल्यासारख वाटू लागलं....
-- अरे वा ... त्या बाई म्हणाल्या ... आता वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक ह्या पदामध्ये अरे वा म्हणण्यासारख काय आहे ?? असं मला वाटून गेलं ...पण त्या बाईंची आमच्याबद्दलची स्तुती चालूच होती .
-- " आमच्या संध्याला मी किती वेळा सांगते कि बाई स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कर , अभ्यास कर ,,गव्हर्मेंट मध्ये असलं कि काही टेन्शन नसतं .. नाही का?? " त्या बाई म्हणाल्या ..जणू काही गव्हर्मेंट आम्हाला फुकट पगार देत होतं . इतक्यात एक चष्मा घातलेली , सावळीशी, - सावळीशी कसली काळीच..... - मुलगी जिना चढून वर आली . तिने इतकी पावडर लावली होती कि काळ्या रंगात पांढरा रंग मिक्स केल्यावर विचीत्रसा करडा रंग तयार होतो तसा तिचा चेहरा दिसत होता . दातांमध्ये डाव्या बाजूला दात पडल्याने किंवा वाकडा उगवल्याने खिडकी तयार झाली होती . ती मुलगी हसतच वर येत असल्याने आम्हाला ती खिडकी दिसली . ती वर येणारी मुलगी ' संध्या' आहे हे कळायला आम्हाला क्षणाचाही विलंब लागला नाही .
--" हि संध्या , माझी मुलगी...बी. कॉम. झाली आहे सध्या जॉब शोधतेय ." संध्या बाईंच्या आईसाहेब म्हणाल्या
उम्याला मधेच काय झाल कुणास ठाऊक तो मध्येच म्हणाला ," आमच्या आनंद स्पर्धा परीक्षांचा अभ्यास रोज करतो बरीच पुस्तकं पण आहेत त्याच्याकडे" . समोरच्या त्या बाईंना हवा असलेला धागा मिळाला .
-- "हो का?? मग आमच्या संध्यालाही सांगा न कसा अभ्यास करायचा ते...."
आनंद ने उम्याकडे एक घाणेरडा कटाक्ष टाकला .पण लगेच समोरच्या त्या बाईंकडे पाहून उसण हास्य आणून म्हणाला ,"हो..... ठीक आहे , मी सांगेन कसा अभ्यास करायचा ते ..." एखाद्या मुलाने मुलीला लग्नासाठी होकार दिल्यावर ती मुलगी कश्या प्रकारे लाजेल.....तशा प्रकारे संध्याबाई लाजल्या ....मला तर मनात इतक हसायला येत होत कि काय सांगू ....मी उम्याकडे पहिला तर तो ढिम्म चेहरा करून समोर पाहत होता ..
--" ठीक आहे येतो आम्ही , काही लागलं तर सांगा बरं का !! लाजू नका ...आम्ही इथेच खालच्या मजल्यावर रहातो"
--" ठीक आहे ... आम्ही त्या बाईंचा आणि संध्याबाईंचाहि हसून निरोप घेतला .आम्ही रूम मध्ये आलो दरवाजा बंद केला , आणि जो हास्याचा स्फोट झाला !!! आनंद वैतागून आमच्याकडे पाहत होता ...
--" उम्या साल्या तुला नसता शानपना कोणी करायला सांगितला रे? " आनंद चिडला होता . आमचं हसणं चालूच होतं . त्याने उम्याला एक फाईट लाऊन दिली तरी तो हसतच होता...
-- " आता मजा आहे बाबा एका माणसाची .... भारी आयटम आहे बरं का.... आता रोज सकाळ संध्याकाळ शिकवणी ....." उम्या आणि मी जोरजोरात हसत सुटलो .उम्याने लगेच एक गाणं पण तयार केलं... सायोनारा .. सायोनारा च्या चालीवर .... .......संध्याकाळी.... संध्याकाळी .....
येशील का तू.... माडीखाली......
ह्याच्या पुढच्या ओळी मात्र इथे लिहिण्यासारख्या नाहीत .

Thursday, May 26, 2011

संशय कल्लोळ

सोनगिरी हून घरी येणे म्हणजे माझ्यासाठी २ रात्री आणि २ दिवसाचं holiday package असतं .सकाळी मला पाहिजे तेव्हा मी उठतो अगदी दुपारी १२ वाजताही
- अरे किती वेळ झोपतोस तू??? तिकडे पण असाच १० वाजता उठतोस कि काय??----- आई
- कंटाळा आलाय ग . ह्या आठवड्यात जाम काम होतं ---- मी .
हे माझं नेहमीचंच वाक्य असायचं, आणि मी आपला मुलगा ४०० किलोमीटर अंतर पार करून येत असल्यामुळे आईही काही बोलायची नाही,त्या २ दिवसात माझ्या आवडीचे सगळे पदार्थ तयार होतात आणि मी येथेच्छ त्यावर ताव मारतो . माझी १५-२० दिवसांची मळलेली कपडे धुवून इस्त्री करून तयार ठेवली जातात . टीवी च्या रिमोट वर फक्त माझीच बोटे चालतात . आईला आणि माझी बहिण सुमा ला त्या फडतूस सास-बहु च्या आणि मराठी सिरियल्स बघायच्या असतात . सुमा माझ्याशी त्याच्यासाठी भांडली कि आई तिलाच ओरडते. " बघू दे ग त्याला त्याच्या आवडीचे कार्यक्रम , आपण रोजच बघतो ना?? " मला ते एकदम भारी वाटतं. मी एकही chanel नीट बघत नाही आणि सारखा सारखा chanel बदलल्यामुळे टीवी खराब होतो , असं काहीतरी ती आईला सांगत असते... मी पण तसं काही नसतं, असंच सांगतो . पण त्या दिवशी मला टीवी बघण्याचा कंटाळा आला होता. त्यामुळे मी माझी सगळी इस्टेट दान केल्याच्या आविर्भावात ' तुम्हाला काय पाहिजे ते बघा ' असं म्हणून रिमोट आईजवळ दिला., तर सुमा ने त्यावर झडप घातली, आणि मराठी chanel लावला . मला आता काय बघव लागणार याची कल्पना आलीच !!! एक नवीन सिरीयल सुरु झाली आहे आणि ती पुनर्जन्मावर आधारित आहे अशी मौलिक माहिती मला मिळाली . सुरुवातीला येणाऱ्या नावांबरोबर त्या सिरीयल मधली काही पात्रं आणि सीनहि दाखवत होते त्या सिरीयल ची हिरोईन मात्र मला आवडली . सुंदरच होती ती !!! म्हणून म्हटल बघू तरी आपल्याला कथानकाविषयी काही घेणं देणं नाही पण निदान थोडा वेळ तो सुंदर चेहरा तरी पाहायला मिळेल ...शेवटी ती सुरुवातीची नावे आणि ते भयानक संगीत संपलंआणि सिरीयल सुरु झाली . सीन होता --- कथेचा नायक एका मुलीला म्हणजेच त्या सुंदर नायिकेला घरी आणतो आणि घरच्यांना सांगतो कि त्याने तिच्याशी लग्न केलं आहे .नायकाच्या घरचे सगळे लोक टेन्शन मध्ये ...... त्याबरोबर आमच्याही घरात टेन्शन .....
-- अगं आई ह्याने बघ तिच्याशी लग्न केलं ---- सुमा आश्चर्यचकित झाल्याची दिसत होती..
-- कसं काय ग ???... भाजी निवडता निवडता आई ने विचारलं.
-- अगं तो कुठेतरी सोनगिरी का कुठल्यातरी गावात गेला होता त्याला तिथे एक मुलगी दिसली , आणि काही ओळख पाळख नसताना त्याने तिच्याशी लग्न केलं .... का म्हणून विचारलं तर म्हणे मला माहित नाही का केलं ते...
' सोनगिरी ' हे नाव ऐकल्यावर आई आणि सुमा दोघी माझ्याकडे काहीशा भीतीने आणि काहीशा संशयाने पाहू लागल्या .
--" काय झालं ?? काय बघताय माझ्याकडे ? " मी थोडं त्रासिक पणे विचारलं
-- " तू पण सोनगिरीलाच आहेस ना ?? " सुमाने संशयाने विचारले .
-- हं .... मग?? --- मी चेहऱ्यावर शक्य तितकी बेफिकिरी असल्याचं दाखवत म्हणालो .
त्यावर सुमा काही बोलली नाही . ती नुसती आई कडे पाहू लागली.... बहुदा त्या दोघींना माझ्याकडूनही अशाच काहीशा संकटाची जाणीव झाली असावी .- आता मात्र हे जास्तच झालं ..
--" ए ssss बावळट .... डोकं बिकं फिरलं का काय तुझं ? कसल्यातरी सीरियली बघते आणि कायपण डोक्यात विचार आणतेस?? " मी जरा भडकुनच म्हणालो . पण त्या दोघींवर जास्त काही फरक पडला नसल्याचं मला जाणवलं .त्या दोघी आता माझ्याकडे न बघता सिरीयल पाहू लागल्या .सिरीयल मधले ते नायकाच्या घरचे एकदम सुन्न झालेले ... घरातल्या प्रत्येकाचे चेहरे ३-३ वेळा दाखवले जायचे ... नायकाचे वडील आकांडतांडव करायला लागले होते , नायकाची आई तर रडायलाच लागली .... मी चोरून एकदा माझ्या आईकडे पाहून घेतलं तर तीही एकटक सिरीयल बघत होती . भाजी निवडण्याचं काम आता बंद पडला होतं. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ह्यांना रिमोट दिला असं मला वाटायला लागलं. मालिकेच्या त्या भागात अर्धा तास नायकाचं भ्रमिष्टासारख वागणं त्याच्या घरच्यांचे पडलेले चेहरे , त्यातल्या काहींचा झालेला त्रागा , ह्या सगळ्यामुळे गोंधळात पडलेली बिचारी नायिका हे असलंच काहीतरी बघायला लागलं.शेवटी एकदाचा तो एपिसोड संपला .घरात स्मशानशांतता पसरली होती . एकूणच आईच्या डोक्यात आता काय चाललं असावं याचा मला अंदाज आला . सुमाही काही बोलत नव्हती . मला आता हि शांतता खायला उठली , काहीतरी विचारायचं म्हणून मी म्हणालो ," भाजी कुठली केलीय ग आज ?"
--" वांग्याची ". - आईच त्रोटक उत्तर आलं .
" शी ... दुसरं काही नाही का ?"
" रोज रोज तुम्हाला काय नवीन करायचं रे? आता कालच पाव भाजी केली होती ना??- आई वैतागलेल्या सुरात म्हणाली .
आता अशा वेळी शहाण्या माणसाने पुढे काहीही बोलायचे नसते .... सुमानेही डोळ्यांनीच ' शांत राहा ' असे सांगितले . जेवताना आईनेच सुरुवात केली --" आजकालच्या पोरांना खरच काही अक्कल उरली नाही , जरा मोठी झाली कि त्यांना वाटतं कि आपल्याला शिंगं फुटली . त्यांचे निर्णय त्यांचे स्वताच घेतात आणि चुकले कि मग बसतात रडत ...."
--' काय झालं? " बाबांनी विचारलं
--" अहो त्या सावंतांची नीलिमा एका रिक्षावाल्याबरोबर पळून गेली . काय देखणी पोरगी हो !! पण अक्कल कुठे शेण खायला गेली देव जाणे. शिवाय तो जातीबाहेरचा आहे ...."
अरे बाप रे नीलिमाने असला काही प्रकार केला? शाळेत ती माझ्याच वर्गात होती , दिसायला सुंदर होती. मला आवडणाऱ्या अनेक मुलींपैकी तीही एक होती .पण बर आहे आता तिला रिक्षाला पैसे द्यायला लागणार नाहीत ......मी असा विचार करत असताना बाबा आईला काहीतरी बोलले असावेत ..
---" अहो संबंध काय म्हणजे काय?? हे असलं काहीतरी आजूबाजूला घडलं कि त्याचा संसर्ग इतरांनाही होतो . ते हि असेच मुर्खासारखे वागायला लागतात ." शेवटचं वाक्य आई माझ्याकडे बघून म्हणाली .लहानपणी आई चिडली कि मला जाम भीती वाटायची , पण आजकाल ती चिडली कि मला हसायलाच येतं .
--" आई तू टेन्शन नको घेऊ , मी नाही त्या नीलिमा सारखा रिक्षावाल्याबरोबर पळून जाणार ....!" माझ्या ह्या वाक्यावर सुमा आणि बाबा जोरजोरात हसायला लागले .. आई आणखीनच चिडली ... " मकरंद , तुला गम्मत वाटते काय? आणि तुम्ही हसण्यावारी नेऊ नका परवा उषा मावशीचा नंदू म्हणाला , - मावशी , मक्यावर लक्ष ठेव , नाईतर तिकडूनच कोणीतरी पकडून आणेल , आणि आज हे असं काहीतरी टीवी ला दाखवलं."
-- तुझं आपलं काहीतरीच ! आता टीवी ला दाखवलं म्हणजे तसं काही होणार आहे का?? -- बाबा समजुतीच्या सुरात म्हणाले .-- " आई , दादा असं कसं करेल?? तू काहीतरी मनात आणू नको , आणि त्या नंद्याला म्हणावं आधी कमवायला शिक. बी . कॉमच्या शेवटच्या वर्षाला २ दा नापास झालाय ... आणि आपल्याला सांगतोय ...सुमानेही आता आगीवर पाणी टाकायचं काम केलं. खरंच,, बहिणी हव्यात .....आधी आग लावून देण्यासाठी आणि नंतर जास्त पेटलं कि पाणी ओतण्यासाठी ....

Monday, May 23, 2011

.... आसमाँ .... भाग ...१

दुसरा आणि चौथा शनिवार असला कि सगळे घरी पळायचे , कारण २ दिवस सुट्टी असल्याने रत्नागिरीत बसून काय माश्या मारायच्या ?......म्हणून मग चलो घर ! पण ह्या शनिवारी मला जाम कंटाळा आला होता . ह्या शनिवारी इथेच राहायचा ठरवलं. म्हटलं बघू तरी एकट्याला अस किती बोअर होत?
'अरे पकशील २ दिवस त्या पेक्षा घरी चल ' आनंद म्हणाला

' हं ssssss मला माहित आहे हा साला इथे का थांबतोय ते ' ... उम्या नाकाला बोट लावत डोळा मारत म्हणाला
' हट साल्या तुला त्याच्याशिवाय काय दिसतंय?' मी म्हणालो, बघू २ दिवस राहून इथे जायचा यायचा कंटाळा आला यार.
' बघ बाबा आम्ही येईपर्यंत काही उद्योग वाढवू नको म्हणजे झालं- उम्या
'ठीक आहे ठीक आहे '- आता ह्या उम्याला काय बोलायचं म्हणून मी जास्त काही बोललो नाही .
ऑफिस मधून ते दोघे दुपारच्या जनशताब्दी ने गेले. ऑफिस पावणे सहा ला सुटले. दुसरा शुक्रवार असल्याने पुढच्या २ दिवस सुट्टी होती त्यामुळे बरेच जण आनंद आणि उम्यासारखे लवकर निघून गेले होते. ऑफिस सुटल्यावर घरी जायचा तर काही मूड नव्हता कारण घरी कोणीच नव्हत . कंटाळा आला कि आमचं फिरायचं एकच ठिकाण - ते म्हणजे मांडवी ! . शनिवार रविवार मांडवीला गर्दी असते , पण आज शुक्रवार असल्याने जास्त गर्दी नसणार , आणि तसेच झाले . अगदीच कमी माणसं होती त्या जेटीवर .बर झालं ! आता जरा निवांत पणे बसता येईल, असा विचार करून मी जेटीच पाण्यात गेलेलं शेवटचं टोक गाठलं .अगदी शेवटच्या चौथर्यावर जाऊन बसलो . पायाखाली लाटांच पाणी येऊन आदळत होतं. पांढरा फेस तयार होऊन लगेच विरघळत होता समोरचा सूर्य लालबुंद झाला  होता .मला सूर्यास्त बघायला फार आवडतो . एकामागोमाग लाटा पायावर येऊन आदळत होत्या .
- एवढी उर्जा पाण्यात कुठून येत असेल? असा विचार डोक्यात आला .
- पुराण काळात कोणी तरी ऋषी होते त्यांनी म्हणे सगळा समुद्र पिला होता . पण त्यानंतर त्यांचे काय हाल झाले असतील?
- हे पाणी किती खोल असेल?
- आता त्सुनामी आली तर ? हे असले काहीही विचार डोक्यात यायला लागले.
- आता मी बसलो आहे त्या जागेवरून जरा जरी डावीकडे सरकलो तर मी खोल पाण्यात पडेन - डाव्या बाजूचे काळे पाणी मला अधिकच भयानक वाटू लागले .मी नीट सावरून त्या कट्ट्यावर बसलो. खरंतर आज गर्दी नसल्याने कुणीच त्या जेटीच्या टोकाकडे फिरकतही नव्हते . तक्यात मागून काही मुलींचा हसण्याचा आवाज आला.मी सहज मागे वळून पहिला तर कला बुरखा घातलेल्या ३ मुली जेटीच्या टोकाशी येत होत्या .त्याचा चेहराही काळ्या फडक्याने झाकला होता फक्त डोळे उघडे होते . त्या तिघी कमालीच्या गोऱ्या होत्या निदान त्यांच्या डोळ्यावरून तरी ते दिसत होत . त्यातल्या एका मुलीने माझ्याकडे पाहिलं आणि मीहि तिच्याकडे ! माझी नजर तिच्या नजरेत अडकल्यासारखी झाली माझं र्हुदय जोराने धडकल्याच मला जाणवलं.तिचे डोळे मला गहिऱ्या सागरासारखे वाटले २-३ क्षणात ती माझ्या समोरून गेली . पण तिची नजर बाणासारखी लागली
--अय्या आपा कितना मस्त है ना? पुढे जाऊया अजून ??- ती मुलगी दुसरीला म्हणाली
- नाही हा आस्मा, ज्यादा आगे नही - ती दुसरी मुलगी पहिल्या मुलीला म्हणाली ...अच्छा तर तिचे नाव आस्मा होत तर!!!
आस्मा ... आस्मा ... मी वर आकाशाकडे बघितल. मस्त नाव आहे .त्या मुलींबरोबर आणखी १ मुलगी होती ,त्यांच्या पुढच्या संभाषणावरून असे कळले कि त्या तिघी बहिणी आहेत आणि बऱ्याच दिवसांनी मांडवीला फिरायला आल्या आहेत त्या ३ मुलींपैकी आस्मा आणि तिची छोटी बहिण पाण्यात जाऊन खेळायला लागल्या लाट जशी येईल तशी आस्मा आणि तिची छोटी बहिण मागे पळत येत होत्या .ती मधेच माझ्याकडे एखादी नजर टाकायची माझ्या हृदयात एकदम धस्स व्हायचे .उम्याला बुरखा घातलेल्या मुली जाम आवडतात. तो म्हणतो त्यांचं खंर सौंदर्य हे त्यांच्या डोळ्यात असतं.बरोबर बोलत होता साला !!! तिच्या डोळ्यात काजळ घातल्याने ते अधिकच आकर्षक दिसत होते.आस्मा आणि तिच्या छोट्या बहिणीची मस्ती चालू होती . त्या दोघी थोड्या पाण्यात जाऊन एकमेकींवर पाणी उडवत होत्या
. त्यांची मोठी बहिण त्यांना ओरडत होती पण त्या दोघी काहीही ऐकायच्या मनस्थितीत दिसत नव्हत्या .मीही त्यांचा तो पाणी उडवण्याचा खेळ बघत होतो. आस्मा मधेच माझ्याकडे बघत होती .खरच तिच्या डोळ्यातून सटां सट गोळ्या सुटत होत्या , आणि एव्हाना माझ्या शरीराची चाळण झाली होती . त्या खेळत असताना अचानक एक मोठी लाट आली. ती लाट इतकी मोठी होती कि आस्मा आणि तिची लहान बहिण दोघी धडपडल्या , आस्मा जेटीच्या अगदीच बाजूला ढकलली गेली , आणि काही कळायच्या आत ती बाजूच्या खोल पाण्यात पडली ....अरे देवा !!! हे काय झालं ?? असं काही होईल असं वाटलंही नाही मला.तिची लहान बहिण मोठमोठ्याने रडायला लागली आणि मोठी बहिण जोरजोरात ओरडू लागली . त्यावेळी जेटीवर फक्त मी आणि त्या तिघीच होतो ,( आणि आता त्या दोघी...) अरे देवा , आता काहीही झालं तरी मलाच काहीतरी कराव लागणार होतं, कारण तिच्या दोघी बहिणी आरडाओरडा करण्यावाचून दुसरं काही करू शकत नव्हत्या .अचानक मला कहो ना प्यार है मधला तो सीन आठवला ज्यात मासे पकडायला गेलेली अमिषा पाय घसरून समुद्रात पडते आणि र्हीतिक रोशन पोहायला येत नसतानाही तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारतो ( हा सीन मला त्या विचित्र वेळी का आठवला ते आजही कळले नाही) परंतु हृतिक आणि माझ्यामध्ये एक साम्य होतं - आम्हा दोघांनाही पोहता येत नव्हतंआणि आस्मा फक्त बुडण्याचा नाटकच करत असेल हि रिस्क मी तरी घेऊ शकत नव्हतो .एव्हाना आस्मा ने २-३ गटांगळ्या खाल्या होत्या . तिला खाली वाकून हातही देता येत नव्हता . अचानक मला माझी बैग आठवली आणि तिला असणारा तो पट्टामी तो पट्टा क्लिप मधून काढला आणि धावतच गेलो .

- आपा ... आपा...
- आस्मा ..... आस्मा .....दोघी बहिणी एकमेकींना हाक मारत होत्या .
- एक मिनिट , तिला हा पट्टा पकडायला सांगा , मी हा पट्टा पाण्यात टाकतोय ... मी तिच्या आपा ला म्हणालो.
- आस्मा ये पट्टा पकडले .. जल्दी ssssss तिची आपा तिला ओरडून सांगत होती. आस्मा तो पट्टा पकडण्याचा प्रयत्न करत होती पण पाण्याच्या लाटेमुळे तो तिला पकडता येत नव्हता.अखेर कसाबसा तिने तो पट्टा पकडला , मी आणि तिची मोठी बहिण तिला खेचू लागलो . तिची छोटी बहिण आम्ही काय करतोय ते पाहण्यासाठी जवळ आली

- पीछे हट रेहाना , नै तो तू भी जायेगी पानी में....आपा चा जोरदार ओरडा काहून तिची छोटी बहिण रेहाना मागे सरकली . आम्ही दोघांनी मिळून आस्मा ला बाहेर काढलं.पाणी नाकातोंडात गेल्याने ती खोकत होती .तिच्या आपाने तिला जोरदार मिठीच मारली , आणि ती रडायला लागली ह्या सर्व गोंधळात माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि आस्मा च्या तोंडावरचा तो काळा पडदा पाण्यात कुठेतरी गायब झाला होता. आणि इतका वेळ नुसत्या डोळ्यांनी गोळ्या मारणाऱ्या आस्मा चा मुखचंद्र माझ्या समोर होता . अप्रतिम लावण्य.... आणि ते हि भिजलेलं.... पाण्यामुळे तिच्या डोळ्यातलं काजळ विस्कटून डोळ्याच्या आजूबाजूला पसरलेलं....पण त्यातही ती अतिशय सुंदर दिसत होती . तिचा बुरखा भिजून अंगाला चिकटलेला होता.... . केस भिजलेले ... कानातल्या झुमक्यांतून अजूनही थेंब थेंब पाणी टीपकत होतं.
- आपा, मै तो मर हि गई थी.... असं म्हणून आस्मा तिच्या बहिणीच्या गळ्यात पडली आणि रडू लागली .
- हट पगली ऐसा नही बोलते .... असं म्हणून तिची बहिण तिला समजाऊ लागली .' ये भाईसाब थे इसी लिये अच्छा हुआ , शुक्रिया जी ' आस्मा ने ह्यावेळेस माझ्याकडे पाहिलं .तिचे डोळे जणू मला सांगत होते .. thank you ... thank you very much .....
-चल अब घर चालते है ... चल रेहाना ....
त्या तिघीही जाऊ लागल्या मी तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत उभा राहिलो .त्या थोडा पुढे गेल्या असतील तोच आस्मा ने पुन्हा एकदा माडे वळून माझ्याकडे पाहिलं .त्यावेळी तिच्या डोळ्यात धन्यता , कृतज्ञता , प्रेम असे किती भावांचे प्रकार असतील तितके भाव दाटले होते . " अगर खुदा ने चाहा तो इसी आस्मा के नीचे हम फिर मिलेंगे " असेच काहीसे तिचे डोळे सांगताहेत असं मला वाटलं