Wednesday, July 27, 2011

.....आसमाँ....भाग - ६.....

ऑफिसचे काम संपवून मी घरी आलो. टीवी बघण्याचा मूड नव्हता , पण मग काय करायचं ते पण समजत नव्हतं ... करायला काही काम नसलं कि मोबाईल नेहमी आपल्या मदतीला नेहमी धावून येतो,  मोबाईलशी खेळत बसणे हा त्याचा लोकांशी संपर्क साधण्याव्यातीरिक्त आणखी एक उपयोग आहे .... मोबाईल हातात आल्यावर मला साहजिकच आसमाँची आठवण आली. मांडवीच्या पहिल्या भेटीनंतर मधे ५-६ दिवस गेले...त्यानंतर ना तिचा फोन आला ना मेसेज..! .आणि मला पण महिनाअखेरचे बरेच काम असल्याने वेळ मिळाला नाही ... ' आसमाँ विसरली कि काय आपल्याला...??'  एक विचार मनाला चाटून गेला...ती आपला विचार करत असेल का?? आणि करत असेल तर मग आपल्याला फोन किंवा मेसेज का करत नाही??... ' असल्या बाबतीत मुली कधीही पाहिलं पाउल टाकत नाहीत....' उम्याचं हे वाक्य मला आठवलं...असेलही तसं कदाचित ...!! .म्हणून मीच आता पाहिलं पाउल टाकायचं ठरवलं..

hi .... busy ??
no fon ... no msg???

तिचा रिप्लाय थोड्या वेळाने आला ...

yes... little bit ...how r u?

म्हणजे अजून विसरली नाही तर....!! बरं वाटलं....

i m fine .... and u ?

me too...

तिची उत्तरे फारच त्रोटक येत होती.... आता आपल्यालाच काहीतरी लिहायला लागणार.... म्हणून मी टाईप केलं

That was the most beautiful day of my life ....

मेसेज पाठवून मी तिच्या रिप्लाय ची वाट बघत बसलो....मला वाटलं, ती पण असाच काहीतरी रिप्लाय देईल.......पण....

Which Day...???

घ्या ....!!! आता काय बोलायचं ?? तिचा रिप्लाय बघून मला उम्या बोललेल्या एका वाक्याची आठवण झाली...'.मुली एकतर डोक्याने कमी तरी असतात नाईतर एकदम महाचालू.......' पण मला आसमाँ त्या दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारची वाटत नव्हती...ती खूप साधी सरळ होती....मला तर आता तिची प्रत्येक गोष्ट आवडायला लागली होती.... तिचं दिसणं ... तिचं हसणं....तिचं नजाकतीचं हिंदी बोलणं....वा...!! आपल्या हिंदी फिल्म मधली एखादी बावळट नायिका तिच्या मैत्रिणीला ' कही ये प्यार तो नही...?? ' असं विचारते तसं मला वाटायला लागलं....खरंच...!! तिच्या पहिल्या भेटीपासून मला पण तसंच वाटतंय ....इतक्यात परत मेसेज टोन वाजला...

oh... r u taking about mandvi ...??
Really , that was a nice date .....

तिचा रिप्लाय वाचून मला हवेत तरंगल्यासारखं वाटलं...पिसासारखं...! तिची ट्यूब जरा उशिरा पेटली ...पण ठीक आहे ., निदान तिने लगेच तसा रिप्लाय पण दिला..... मला उम्याला सांगावसं वाटत होतं कि डोक्याने कमी आणि महाचालू मुलींबरोबर तिसऱ्या प्रकारच्या मुली पण असतात.... साध्या आणि सरळ स्वभावाच्या .....आसमाँसारख्या ....!! आता काहीतरी Romantic लिहिलं पाहिजे .....

aajkal mala tuch distes sagalikade ....
ani swapnat pan yetes .....

हे जरा जास्त फिल्मी टाईपचं झालं असं मेसेज पाठवल्यानंतर मला वाटायला लागलं.....

Wow..... kay baghitlas swapnat.....???

 आता आली का पंचायत .....!! मी आपलं काहीतरी Romantic लिहावं म्हणून फेकलं होतं ते ....! आणि आता ही मला विचारत होती कि स्वप्नात काय बघितलं ...? आता काय सांगायचं ?? मी काय बघितलं स्वप्नात....??? विचार करता करता मला अचानक शाळेतल्या आणि कॉलेज मधल्या परीक्षा आठवायला लागल्या ....पेपर मधे काही येत नसलं कि मी अशा काही फेका मारायचो , कि क्षणभर पेपर तपासणाऱ्या शिक्षकाला प्रश्न पडत असावा , कि मी शिकवलेलं बरोबर कि ह्याने लिहिलेलं....??? चला ... बरं झालं आठवलं मला ते .... माझा आत्मविश्वास वाढला त्यामुळे.....!!

mi paahila , apan doghech son-durgavar geloy....
aapalya aajubajula konihi nahi.....
maza haat tuzya haatat hota....

आणखीही काहीबाही लिहिणार होतो .... पण मनात म्हणल, बास ...! सध्या इतकंच पुरे ....! मेसेज सेंड केला , ती नक्की हसली असेल मेसेज वाचून ...मी पक्का फिल्मी टाईपचा आहे असाच विचार केला असणार तिने...पण आता काय करू शकतो...?? स्वप्नच ते.....! त्यात काहीही घडू शकतं.... तो थोडाच न्यूटनचा गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे , अगदी शास्त्रीय पद्धतीने घडायला....?? तिला काय विचार करायचा असेल तो ती करेल , पण रिप्लाय येणार हे नक्की...! म्हणून मी रिप्लाय ची वाट बघू लागलो...

gr8 ... mag...??

फक्त एव्हढाच मेसेज.....?? आजीची गोष्ट ऐकताना नातवंड जशी विचारतात तशी ती विचारत होती..... आता आणखी काहीतरी फेकायला लागणार....

mag aapan baraach vel suryast baghat basalo.....

suryast वगैरे जड मराठी शब्द कदाचित कळणार नाहीत म्हणून ते खोडून sunset केलं ...आता माझं डोकं चालेनासं झालं ...पुढे काही सुचलं नाही म्हणून तसाच मेसेज पाठवून दिला...

Wow .... Mag...???

पुन्हा तसाच रिप्लाय ...!! अशाने माझं एखादं महाकाव्य तयार होईल फेकाफेकीचं ....! असं मला वाटायला लागलं.

mag mi jaga zalo....

हा मेसेज पाठवून मी त्या न पडलेल्या स्वप्नाचा शेवट करून टाकला... आणि कुठून तो स्वप्नाचा मेसेज पाठवला याबाबत पश्चाताप व्हायला लागला ...

so... what next....??

तिचे मेसेज अत्यंत त्रोटक होते...एक तर ती कोणत्या तरी कामात असेल किंवा ती माझ्या विचारांबद्दल जाणून घेत असेल ...पण काही का असेना ...मला हे असं अप्रत्यक्ष पणे तिच्याशी संवाद साधायला आवडत होतं हे नक्की ....! आणि कदाचित तिलाही ....!! what next....?? चे उत्तर काय द्यावे ....?

ata navin swapnachi waat baghatoy.....

माझ्या ह्या रिप्लायवर मी स्वतःच खुश झालो....

Mag , aapn fakta swapnatach bhetaycha ka..???

ती विचारत होती....अरे मूर्खा , म्हणजे तिला आपल्याला पुन्हा भेटायच आहे तर....! हा मेसेज वाचून जुन्या हिंदी फिल्म मधे अत्यानंदाच्या क्षणी जशा भराभर सतारीच्या तर वाजतात तशा वाजल्यासारख्या मला भासल्या....

mhanje ??

मी मुद्दामच मला काही कळलं नाही असं मी दाखवलं....बघू काय लिहितेय ती....

are vedya , mhanje aapan bhetuya ...

शेवटी तिने सांगूनच टाकलं....आणि मला पण तेच पाहिजे होतं .... वाह मक्या ....!!! मी माझीच पाठ थोपटली....हा एवढा सगळा मेसेज-प्रपंच त्यासाठीच तर केला होता ... आणि मी त्यात यशस्वी ही झालो होतो....

ohh... really ...? when ? .... where ?

मी अधाशीपणे विचारले....बराच वेळ तिचा रिप्लाय आला नाही.....आता काय झालं ?? थोड्या वेळाने मेसेज टोन वाजला

this saturday ....5 pm.... @ son-durg ....!

Saturday, July 16, 2011

.... भूतबंगला ....!सोनगीरीत ऑफिस ला जॉईन झाल्यानंतर आमच्यापुढे मुख्य प्रश्न होता तो म्हणजे घराचा..! सुरुवातीला शासकीय विश्रामगृहात आमची सोय झाली, पण तिथे जास्त दिवस राहता येणार नाही , असं आनंद म्हणाला...त्यामुळे आम्ही युद्धपातळीवर घर शोधायच्या कामाला लागलो.....बऱ्याच ठिकाणी आम्ही घर शोधायचा प्रयत्न केला परंतु आमच्या पदरी निराशाच आली...आणि एक भयानक अनुभवही आला..... त्याचं काय झालं ......एके दिवशी रात्रीचं जेवण करून आम्ही आमच्या नेहमीच्या घर शोधण्याच्या उद्योगाला लागलो... मेन रस्ता सोडून आतल्या एका गल्लीमध्ये एक बिल्डिंग दिसली .. त्याखाली १ इस्त्रीच दुकान होतं. मी सहज त्या दुकानदाराला इथे एखादी रूम भाड्याने देण्यासाठी आहे का म्हणून विचारलं .
--" रूम पायजेल ....?? उम्म्म .. एक आहे .. बंगला आहे मस्त ...! ... " इस्त्रीवाला म्हणाला
वा ....आंधळा मागतो १ डोळा आणि देव देतो २ ... बंगला ?? आमचे मनोरथाचे घोडे गंगेत नहाले...
-- " आता मिळेल का बघायला?? " आनंद ने विचारले .
-- " चला दाखवतो..." म्हणत तोही उठला... जणू काही तो आमचीच वाट बघत होता. त्याने बंगल्याची चावी घेतली. आणि निघाला .. आम्ही पण त्याच्या मागे जाऊ लागलो. इस्त्रीवाला सांगत होता , बंगला एकदम मस्त आहे, पुढे गार्डन आहे , पाण्याचा प्रोब्लेम नाही वगैरे वगैरे ' . आम्ही आपलं ' हो का ....अरे वा ...'. करत त्याच्या मागे चालत होतो. इस्त्रीवाल्याच नाव बबन होतं....तो आम्हाला मुख्य रस्त्यापासून जरा आत आड रस्त्याला घेऊन गेला.... तिथे बराच अंधार होता...
-- " काय हो , असाच अंधार असतो का नेहमी इथे ??" आनंद ने बबन ला विचारले , त्यात थोडी चिंतेची झाक दिसत होती..
--" त्याच काय आहे ,,इथे राहत नाही ना कोणी , बंगला बंदच असतो...आतून बाहेरच्या लाईट लावल्या कि प्रकाशाच प्रकाश ! " बबन बंगल्याच्या त्रुटी झाकण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटलं...आम्ही आपले त्याच्या मागे अंदाजाने पावलं टाकत चाललो होतो...तिथं इतका अंधार होता कि कुणी डोळ्यात बोट घातलं असता तरी दिसलं नसतं.... अंधारामुळे दिसत नसल्याने
असेल किंवा घाबरल्याने असेल , आनंद माझ्या हाताला धरून चालत होता.... उम्या मात्र आपलाच बंगला बघायला जातोय अशा थाटात बिनधास्त बबनच्या मागे चालत होता....अखेर एका जुनाट गेटपाशी येऊन आम्ही थांबलो... त्याला नुसतीच एक साखळी गुंडाळलेली होती...गेट उघडताना हिंदी हॉरर फिल्म मधे येतो तसा.... कर्रर्र .....आवाज झाला...' आयला कुठून मारायला आलो इथे ' असं मला वाटायला लागलं .... थोडं पुढे गेल्यावर , " इथे पायऱ्या आहेत बरं का...." बबन ने आम्हाला सूचना केली ... आम्ही अंदाजाने चालत होतो.... उम्या आमच्या पुढे चालला होता... तो पायऱ्या चढत असताना , अचानक..... म्याआव्व्व्व ssssss....आयंव ssss आयंव .sss असला काहीतरी भयानक विचित्र आवाज झाला..... आणि त्याबरोबर उम्याची भयाकारी किंकाळी आली... " ओय ... ओय ..." करत घाबरत उम्याने टणाटण तीन - चार उड्या मारल्या... आनंद ने तर घाबरून माझा हात आणखीनच घट्ट पकडला...त्यामुळे मी पण थोडा घाबरलो...
--" अहो काय झालं ??? काय झालं ???" करत बबन विचारत होता...त्याने त्याच्या जवळची छोटी टोर्च मारली.... तर तिथे एक छोटं मांजरीचं पिल्लू केकाटत होतं... अंधारात उम्याचा पाय चुकून त्याच्यावर पडला होता बहुतेक...! त्या टोर्च च्या प्रकाशात मी उम्याचा चेहरा पाहिला तर तो चांगलाच टरकलेला दिसला मला...!
--" अहो टोर्च होती, तर मघाशीच का नाही लावली...?? " उम्या बबनला विचारत होता.....त्याच्या स्वरांवरून तो पक्का घाबरलाय हे आम्ही ओळखलं .....
--" अहो काय घाबरताय...!! मांजराचं पिल्लूच ते....!! वर हे बबन आम्हालाच सुनावत होता.... एकूणच इथे जमलेल्यांपैकी बबन सोडून बाकी सगळ्याची पाचावर धारण बसलेली आहे हे मला जाणवलं..... बबन ने दरवाज्याचं कुलूप उघडलं , आणि आत शिरून खटां-खट सगळी बटण दाबली...सगळ्या बंगल्यात प्रकाश पसरला...अचानक डोळ्यावर पडलेल्या प्रकाशामुळे आमचे डोळे दिपले...प्रकाशाशी समायोजन साधण्यात काही क्षण गेल्यानंतर आम्ही पाहिलं.....प्रचंड मोठा हॉल ....आणि त्यात अतिशय सुंदर इंटिरियर केलेलं , ....जुन्या वाड्यांमध्ये असतं तसं.....सुरेख नक्षीकाम केलं होतं ...छताला मधोमध एक मोठं कीमती झुंबर लावलेलं होतं...बाकी हॉल मधे तितकंसं सामान नव्हतं ....
--" हा हॉल.... बघा कसा भारी आहे ....!! इकडे आत ३ रूम आहेत ,...toilet बाथरूम आहे ..." बबन आम्हाला उत्साहात सांगत होता ...एखादं प्रदर्शन बघितल्यासारख आम्ही सगळ्या रूम आणि किचन बघून घेतलं.....परत हॉल मधे येता येता मी विचारलं ," काय हो भाड्याचं कसं काय?? " तर काहीच उत्तर आलं नाही.....आम्ही मागे, इकडे तिकडे बघितलं तर बबन कुठेच दिसेना..." अरे तो बबन कुठे गायब झाला ?? " आनंद भयमिश्रित गंभीर आवाजात विचारत होता...
--" इथेच तर होता, आपल्या मागे...मग कुठे गेला...? उम्याही घाबरत म्हणाला... त्याच्या डोळ्यात भय स्पष्टपणे दिसत होतं...." इथेच आतल्या रूम मधे असेल रे ... उम्या बघ रे...!! " मी त्या दोघांना धीर देत म्हणालो खरं... पण माझीही अवस्था त्यांच्यापेक्षा वेगळी नव्हती...
-- " हट .... मी नाही जाणार आतल्या रूम मधे ... मरू दे त्याला....!! आपण निघू इथून..." उम्या एकटा आत जायला घाबरत होता....तोच काय पण आमच्या पैकी कोणीही आत जाऊन पाहण्याचं धाडस दाखवलं नसतं.....
--" ओ .... बबन....!!.... बबन....??? " मी बाहेरूनच त्याला हाक मारण्याचा प्रयत्न करू लागलो...परंतु काहीच आवाज येईना...
--" त्याचे पाय बघितलेत का कुणी....?? " आनंद घाबरत काहीच्या काही विचारायला लागला...हे मात्र जरा जास्तच झालं...
तेवढ्यात आमचं लक्ष दरवाज्याच्या उजवीकडे असलेल्या भिंतीवर गेलं...भिंतीवर एक भला मोठा फोटो लावलेला होता... आणि जुन्या काळातला एक लामणदिवा त्याला लटकवलेला होता... त्या फोटोमध्ये एक व्यक्ती उभी होती....थोडी रागीट चेहऱ्याची .... पांढऱ्या पोशाखात....आम्ही जवळ जाऊन पाहिलं तर तो फोटो नसून एक तैलचित्र होतं...
--" हा ... हा फोटो इथे कसा आला...?? मघाशी तर नव्हता .... " उम्या आता कसल्याही शंका उपस्थित करायला लागला...त्यामुळे मला पण तो चित्रातला माणूस भयानक वाटायला लागला...
--" मरू दे... आयला...चला निघू इथून..." असं म्हणत आम्ही मागे फिरलो, आणि पाहतो तर काय...., एक पांढऱ्या कपड्यातला उंच माणूस आमच्या मागे उभा होता...तो अचानक समोर आल्याने अस्फुटशी किंकाळी आमच्या तिघांच्याही तोंडून बाहेर पडली...उंची ६ फुटांवर , संपूर्ण पांढरे कपडे , चप्पलही पांढरी , खांद्यापर्यंत लांब लालभडक केस, आणि निळसर डोळे...अचानक त्याला बघून आम्ही जामच टरकलो...!
--" अहो... काय झालं ?? ..एवढे का घाबरलात??? " तो माणूस आम्हांला विचारत होता .
--"न ...न.... नाही... तू... तू... तुम्ही कोण...?? उम्याने घाबरत घाबरत विचारले...आनंद ने परत घाबरून माझा हात धरला..
--" मी मालक आहे ह्या बंगल्याचा.... मघाशी इथून जात होतो तर बंगल्यात प्रकाश दिसला म्हणून आलो.... तो बबन कुठाय...??? " तो माणूस विचारत होता...
--" अहो तो मधेच कुठेतरी गायब झाला...." मी कसाबसा बोललो...मागच्या चित्रातला हाच माणूस समोर प्रगट झाला नाही ना....?? म्हणून मी हळूच घाबरत ते तैलचित्र पाहून घेतलं.... ' हा कुणीतरी दुसराच होता...' मी आनंद कडे बघितलं तर तो त्याचे पाय निरखत होता.... पायही सरळच होते...
--" काय...? गायब झाला म्हणजे.....?? " असं म्हणून त्याने एक जोरदार हाक बबन ला मारली.... " आलो... आलो साहेब..." करत ते बावळट ध्यान आतल्या रूम मधून पळत आलं...
--" जरा बंगल्याच्या मागच्या बाजूला गेलो होतो ...विहिरीवर झाकण टाकलं... कचरा पडू नये म्हणून...." तो सांगत होता... आयला, हा गायब झाला असं वाटून केवढी घाबरगुंडी उडाली आमची... !!!
--" बरं ... बंगला आवडला ना तुम्हाला....?? १००० रुपये भाडं आहे , लाईट, पाणी वेगळं.... " तो पांढऱ्या कपड्यातला माणूस सांगत होता...आम्ही यापूर्वी पाहिलेल्या जागांपेक्षा ही जागा चांगलीच प्रशस्त होती...पण त्यामानाने भाडं फारच कमी होतं.... इतकं कमी भाडं ऐकून आमच्या मनात शंकेची पाल पुन्हा चूकचुकली .....
--" फक्त एक अट आहे ....." तो मालक बोलू लागला.... , " फक्त वर्षातून २ दिवस आमचा एक माणूस इथे येईल, आणि हा जो तुमच्या मागे फोटो आहे ना त्याला दिवाबत्ती करेल....आणि पूजा करेल...बाकी काही अडचण नाही..." आम्ही परत ते चित्र पाहू लागलो...म्हणजे हा भयानक फोटो मालक काही काढणार नव्हता तर ...
--" कोण आहेत हे.....? " मी सहज मालकांना विचारले...
--" हा माझा मोठा भाऊ.... ह्या बंगल्यात राहायचा .... इथेच त्याने आत्महत्या केली.... ह्या झुम्बराला लटकून...! ." आम्ही तिघेही तडक त्या झुम्बराखालून बाजूला झालो...आता असल्या बंगल्यात कोण राहील....???
--" ठीक आहे ... आम्ही सांगतो तुम्हाला नंतर..." असं म्हणून आम्ही तिथून सटकलोच ...पळत पळत बाहेर आलो..... मुख्य रस्त्यावर आल्यावर सहज मी मागे पाहिलं....बंगला परत अंधारात गडप झाला होता.........

Wednesday, July 13, 2011

..... उम्याची फजिती .....!!!


ऑफिस सुटल्यावर उम्या आम्हाला न सांगताच कुठेतरी गायब झाला...
--" कुठे गेला रे तो ?? " आनंद विचारत होता...
-- " मला काही बोलला नाही....पण घाईत होता .... " मी म्हणालो...
_ " मला जाम भूक लागली रे .... चल ना काहीतरी मस्त खाऊ... " आनंद लहान मुलं भूक लागल्यावर करतात तसा चेहरा करून म्हणाला..
--" चल., ' द्वारका' मधे जाऊ, मस्त पाव-भाजी हादडू ...." मी त्याला सुचवलं ...तोही लगेच तयार झाला....'द्वारका' हे उत्तम snacks मिळणारं प्रसिद्ध हॉटेल आहे . बऱ्याच कॉलेज मधल्या मुलामुलींचं ते आवडतं ठिकाण आहे ..... एकतर तिथे बसण्याची व्यवस्था चांगली .... आणि क्राउड पण चांगला असतो..... ऑर्डर दिल्यानंतर मागवलेला पदार्थ बऱ्याच वेळाने येत असल्याने इकडे तिकडे बघत टाईमपास चांगला होतो....आम्ही दोघांनी पण ऑर्डर दिली आणि टाईमपास सुरु केला.....आमच्या बाजूला एक कॉलेज चा मुलामुलींचा ग्रुप होता ... त्यांची कसली तरी पार्टी होती बहुतेक......! हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता..... मधेच त्यांचा गोंगाट वाढला, कि त्या ग्रुप मधलं कोणीतरी इतरांना ' शांत बसा ' च्या सूचना करत होतं..... आणि जर ग्रुप मधे मुलींचा समावेश असेल तर मुलांना भलताच चेव येतो.... प्रत्येक जण मुलींवर इम्प्रेशन मारायचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत होता.... आपण किती ' कूल ' आहोत हे जो तो दाखवत होता ...आणि मुली पण लाडीकपणे बोलून त्यांना चेतवण्याच काम करत होत्या ...
--" आयला ह्या पोरांच्या ...... काय गोंधळ लावलाय.....!!! " आनंद वैतागलेला दिसला...
--" जाऊ दे रे ....दिवस आहेत त्यांचे .... मजा करू दे....." मी त्या गोंधळ घालणाऱ्या मुलांची बाजू घेत म्हणलो.....
--" हा साला वेटर पण किती वेळ लावतोय ....? " आनंद ला कदाचित जास्त भूक लागली असावी.... तो वेटर च्या शोधात इकडे तिकडे बघू लागला....
--" आणेल रे तो.....तोपर्यंत बाजूचा टाईमपास बघ कि....." मी त्याला सुचवलं....
--" कसला टाईमपास आयला.... डोकेदुखी आहे नुसती....!! आता ती लाल ड्रेस वाली मुलगी बघ , उगाचच तोंडाचा चंबू करून बोलतेय मघापासून..... ह्या असल्या मुली बघितल्या कि डोकंच फिरतं माझं.! ... एक कानाखाली ठेऊन द्यावीशी वाटते... .."
आनंद च्या ह्या बोलण्यावर मला हसायला आलं...
--" मग ? कशा प्रकारच्या मुली आवडतात तुला?? " मी योग्य प्रश्नाचा खडा टाकला...
--" अरे मुली कशा पाहिजेत.... शांत , सरळ...जास्त बडबड न करणाऱ्या ....." आनंद बोलत असताना मी मधेच म्हणालो , " म्हणजे , संध्या सारख्या.....!!! " आणि मिश्कील पणे त्याच्याकडे बघत राहिलो....
--'' हट ....ती कसली काळूंद्री....!!! तुम्ही लोक पण पक्के शाणे आहात , खराब माल आमच्याच गळ्यात घालणार.... त्याजागी एखादी सुंदर गोरी मुलगी असती तर , तिला शिकवण्यासाठी एकमेकांचे जीव घेतले असते तुम्ही..." तो वैतागून बोलत असताना मला हसायला आलं..आणि ते खरंही होतं...हसता हसता मी सहज हॉटेलच्या गेट कडे पाहिलं , तर उम्या आत येत होता....आणि बरोबर कोणीतरी सुंदर तरुणी !!! .... मी आनंद कडे बघितलं आणि नजरेनेच ' मागे बघ ' असं खुणावलं....
--" अरे .... हा बघ.... !! आणि त्याच्याबरोबर ती पोरगी कोण आहे ??? " आनंद मला आश्चर्याने विचारत होता...
--" आता मला काय माहित ?? हा शाणा तिला भेटायलाच लवकर पळाला वाटतं ऑफिस मधून...."
--" कशा काय पटवतो हा सुंदर सुंदर मुली ?? " आनंद च्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव अद्यापही तसेच होते....आणि ते खरंही होतं.... उम्याबरोबरची ही चौथी नवीन मुलगी आम्ही पहात होतो.....
--" नशीबवान आहे .... !! आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे ती कला आहे ....." मी म्हणालो... उम्याने आत येताना आम्हाला पाहिलं नाही बहुतेक .....आता इतकी सुंदर मुलगी बरोबर असताना तो आम्हाला कशाला पाहील...? .ते दोघे खिडकीपाशी चांगली जागा बघून बसले....त्यांनी वेटर ला snacks ची ऑर्डर दिली...आणि ते बोलत बसले....उम्या मुलींबरोबर असला कि इतका सभ्यपणे वागतो, कि आमच्या बरोबर राहणारा ' दानव' हाच कि कोणी दुसरा असा प्रश्न पडतो...
-- " मक्या , माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आलीय .... जरा कान इकडे कर ... " आनंद गरम तव्यातल्या फुटाण्यासारखा उडत म्हणाला ... त्याची आयडिया ऐकण्यासाठी मी कान केला.....
-- " हा हा हा हा .... भारी आहे... गम्मत करू .....जिरवू जरा त्याची...." आनंद ची आयडिया खरंच मस्त होती... इतक्यात वेटर ने आमची ऑर्डर आणली....खरं तर आता भूक राहिलीच नव्हती....आम्ही जास्त एक्सायटेड झालो होतो...आम्ही पटापट ते समोरचं खाल्लं .... उम्याच्या टेबलवरही त्याची ऑर्डर आली होती... उम्या त्या तरुणीशी बोलत असतानाच आम्ही त्यांच्या टेबलपाशी गेलो....
--" नमस्कार साहेब...." मी अगदी हात जोडून, कृतज्ञता पूर्वक उम्याला नमस्कार केला....उम्या आमच्या दोघांना पाहून चापापलाच....! पण थोडाच वेळ... त्याने पण लगेच नमस्कार केला... समोरच्या तरुणीमुळे तो आमच्याशी इमानदारीत वागत होता....
-- " नमस्कार वाहिनी ...." आनंद ने त्या तरुणीलाच नमस्कार घातला ... तिला बिचारीला काय बोलावं तेच कळेना... ती एकदम गोंधळल्या सारखी आमच्याकडे आणि उम्याकडे पाहू लागली ... उम्याचा चेहरा पाहण्यालायक झाला होता....
--" अरे मूर्खा .., ह्या वाहिनी नाहीत..... मागच्या आठवड्यात भेटल्या ना त्या वाहिनी होत्या ....." मी आनंद ला खोटं खोटं रागावलो...
--" काय...?? " त्या तरुणीच्या गोंधळात आता आश्चर्याची भर पडली... आणि ती उम्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली....
--" तू ह्यांचं काही ऐकू नको ., ते मस्करी करतायत..." उम्या तिला समजावणीच्या सुरात म्हणाला...
--" तुझं लग्न झालंय का....? " तिने संशयाने उम्याला विचारले...
--"अगं तसं काही नाही.... " उम्या बोलायचा प्रयत्न करत असतानाच आनंद मधेच तिच्याकडे बघत म्हणाला..." म्हणजे ?? परवाच्या पार्टी ला तुम्हाला आमंत्रण नव्हतं का ...??? "
--" कोणती पार्टी ??? " ती बिचारी भलतीच गोंधळली होती...
--" अहो साहेबांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी होती परवा...!! जेवण बाकी झकास होतं .....! व्हेज - नॉन व्हेज., दोन्हीही ....शिवाय शेवटी आईस्क्रीम पण.....!! " आनंद पार सुटला होता ....नाटकातल्या ओव्हर रीअक्टिंग करणाऱ्या पात्रासारखा..... उम्या आनंद कडे गोंधळ मिश्रित रागात पहात होता...
-- " धिस इस टू मच ....." त्या तरुणीच्या चेहऱ्यावरच्या गोंधळाची जागा आता रागाने घेतली..." मी हे काय ऐकतेय उमाकांत...??? मला फसवलंस तू....... "
-- " अगं , माझं ऐकून तरी घे... " उम्या बोलण्याचा प्रयत्न करीत असताना च ती भडकून म्हणाली.." आता काय सांगणार आहेस.., कि तुला मुलगी नाही म्हणून...?? "
--" हो.... खरंच नाही...." उम्या तिला पोटतिडकीने सांगायचा प्रयत्न करत होता...
--" साहेब , सॉरी बरं का ?? आम्ही चुकून ह्या बाईसाहेबांसमोर वहिनींचा विषय काढला...आम्हाला वाटलं ह्यांना माहित असेल म्हणून ...." हे बोलत असताना मला खरं तर जाम हसायला येत होतं... पण चुकून जरी हसलो तर सगळंच मुसळ केरात जाईल...म्हणून मी महत्प्रयासानं ते रोखलं.....माझ्या बोलण्याने ती तरुणी तर आणखीनच रागाने उम्याकडे बघू लागली...तिने तिच्या पर्स मधून उम्याने नुकतंच तिला दिलेलं गिफ्ट बाहेर काढलं ... आणि ,.." हे घे...... तुझ्या बायकोला दे...." असं म्हणत ते टेबलावर आपटलं ....आणि फणकाऱ्याने ती जाण्यासाठी निघाली..... उम्याने आमच्याकडे एक भयानक कटाक्ष टाकला... ' बघून घेतो तुम्हाला' अशा अर्थाचा चेहरा त्याने केला... आणि " अगं थांब....अगं माझं ऐकून तरी घे..." असं म्हणत तिच्यामागे बाहेर पळत गेला...." ओ साहेब .... ओ साहेब...." ओंरडत बिचारा हॉटेलचा वेटर बिल घेऊन त्याच्या मागे पळत होता.....

.....

Tuesday, July 5, 2011

..... सुधारणार नाहीत......!!!


संवाद.::- दोन समविचारी मित्रांमधला ....( अत्यंत हळू आवाजातला... )
स्थळ ::- रेलवे चा रिझर्वेशन डबा
वेळ....::- झोपेची सोडून कोणतीही....
.
.
.
-- काही नवीन आहे का? ( इकडे तिकडे बघत )
-- मी पण तेच शोधतोय....
-- तुला काही दिसलं तर मला पण सांग ...
-- हं..... तुझ्या उजव्या हाताला समोर खिडकीत बघ ....लगेच नको बघूस येड्या....
-- सही आहे रे......मस्तच... ( थोड्या वेळाने बघत...)
-- लग्न झालंय वाटत ...
-- कसं काय?
-- लायसन्स आहे .....
-- हो रे ... पण मग काय झालं ? आपण बघितलं नाही तर तो सौंदर्याचा अपमान होईल.....
-- बरोबर आहे ....पण मेंटेन आहे यार....!!
-- बाजूला तो गेंडा कोण बसलाय ?.... फुल के साथ ये काटा कौन है??
-- भाऊ असेल....
-- चेहऱ्यावरून वाटत नाही रे .....
-- मग नवरा असेल....
-- काय साला नशीबवान आहे ...
-- हं ... लंगुर के मुह में अंगूर...
-- पण ते दोघे बोलत का नाहीत ??
-- भांडण झालं असेल...
-- हळू बोल ... ते समोरचे काका आपल्याकडेच बघतायत ....
-- काकाचं काय सांगतोस..... मी मघाशी बघितलं , तर ते पण तिकडेच एकटक बघत होते.....
-- काय सांगतोस..? ...
-- मग काय, आपल्यापेक्षा तेच डोळे फाडफाडून बघतायत ....
-- पण आहेच भारी .... एक नंबर...
-- आयला , आपल्या शेजारी बसायला पाहिजे होती....
-- आपलं नशीब कुठे एवढं भारी ..... ! .आणि बसली असती तर काय केलं असतंस ?
-- बोललो असतो....इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या असत्या ....नंबर वगैरे घेतला असता...
-- तू नाही सुधारेगा....
-- अरे तो शेजारचा गेंडा कुठे गेला ....
-- स्टेशन आलाय रे कोणतं तरी ... उतरला वाटतं??
-- म्हणजे तो नवरा नव्हता तर....दुसराच होता कोणीतरी....
-- म्हणजे एकटी आहे ती ??
-- तसंच वाटतंय....
-- आयला, ह्या अशा एकट्या फिरतात .... मग उगाचच आपल्याला काम लागतं...!
-- कसलं काम लागतं बाबा ??
-- त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागतं ना.....हा हा हा हा ....
-- चप्पल सीट खाली गेलीय ... ती हाताने शोधतेय... , लवकर बघ...
-- वॉव... राईट एंगल ...ऑन राईट टाईम...
-- हा हा हा हा ... मस्त ना?
-- भारीच .....!
-- स्टेशन आलं वाटतं.....उतरायची तयारी चालू आहे ...
-- शिट... लवकर आलं स्टेशन...
-- अरे, जाताना बघून गेली आपल्याकडे...
-- कधी?? कुठे आहे ?? ....अरेरे.... माझं लक्ष नव्हतं....
-- जाऊ दे ... मान मोडेल आता ...
-- तिला सोड ... माझ्या डावीकडे .....क्रीम कलर बघ.....खतरनाक आहे ....
...................................................
...................................................

Sunday, July 3, 2011

.....आसमाँ - भाग -५ ....


                       किनाऱ्यावर लाटांनी पाण्याची एक तात्पुरती सीमारेषा तयार केली होती. भिजलेल्या वाळूवरून ती नागमोडी रेषा स्पष्ट दिसत होती. लाट येईल तशी नवीन सीमारेषा तयार होत होती...मी त्या रेषेच्या हातभर लांब अंतरावर उभा राहिलो . अथांग पसरलेल्या समुद्राकडे पहात......ती मला आज भेटायला येणार होती....मला ते जुनं मराठी गाणं आठवलं.... जिथे सागरा धरणी मिळते .... पण इथे मात्र नायिकेच्या ऐवजी मी वाट बघत होतो...आज त्या गाण्याचा नव्याने अर्थ कळत होता. पहिल्यांदाच वाटलं कि हे वाट पाहणं किती छान असतं ते......
लहानपणी शाळेतल्या सहलीला जायच्या आदल्या रात्री जशी झोप लागत नसे तसंच काहीसं काल रात्री झालं... आज ऑफिस मधून पण लवकर निघण्यासाठी, ' माझा मुंबई वरून एक मित्र आला आहे....त्याला भेटायला जायचंय' , असं मी आमच्या हेडक्लार्क बाईंना सांगून आलो होतो... बाईंनी पण इमानदारीत मला लवकर सोडलं .... मी मुद्दामच लवकर मांडवीला आलो होतो.... जेटीवर न जाता मी समुद्र किनाऱ्यावरच थांबलो ... पण आता बराच उशीर झाला तरी ती अजून कशी आली नाही ?? ... माझी छाती धडधडायला लागली.... आणि ती आल्यावर तिच्याशी काय बोलायचं हा मुख्य प्रश्न तर होताच ....! .मी सहज रस्त्याच्या दिशेने पाहिलं तर ती लांबून येताना दिसली... आईशप्पथ......!!! पण तीच आहे का ती ??? माझा विश्वास बसत नव्हता . मी प्रथमच तिला बिना बुरख्याच पहात होतो... तिने फिक्कट गुलाबी कलर चा चुडीदार घातला होता... त्यावर रेशमी धाग्याची नक्षी उठून दिसत होती.....कानातले झुमके, मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चकाकत होते....तिचा मखमली दुपट्टा वाऱ्यावर उडत होता.... स्वर्गालोकीची अप्सरा जणू भूलोकी अवतरल्यासारखी.....! ती जवळ आली... मी तर तिच्याकडे बघतच राहिलो....

--" मला यायला उशीर तर नाही न झाला ?? " कुणीतरी सतारीच्या तारा छेड्ल्यासारख्या वाटल्या ...
--" अं ..... नाही , फार नाही.... " मी भानावर येत म्हणालो...ती गोड हसली.....
-- " तू आज खूप सुंदर दिसतेयस .... एखाद्या अप्सरेसारखी...." मी हे वाक्य बोलून गेलो खरा , पण नंतर माझं मलाच आश्चर्य वाटलं ... ' वा.. मक्या सुरुवात तर चांगली केलीस....' माझ्या वाक्यावर ती समजुतीने हसली....
-- " तुम्ही पण छान दिसताय आज " तिनेही स्तुतिसुमने उधळली... ' ही आपल्याला अहो - जाहो का करतेय??'
--" तू माझ्याशी एकेरीत बोल ना.... तुम्ही नको तू म्हण..."
--" ठीक आहे .... तू पण छान दिसतोस आज..." तिने लगेच सुधारणा करून मघाशी उधळलेली स्तुतिसुमने पुन्हा उधळली .
--" बास ...!. कळले...!!. " आम्ही दोघेही हसलो.....
_ " बराच वेळ झाला ... मला वाटलं कि तू येतेस कि नाही....." मी आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोललो...
--" वा ... येणार कसं नाही ...! मीच तुम्हाला इथे यायला सांगितलं होतं ना..."
_" अरे .. परत ... तुम्हाला  ??? " मी तिच्याकडे खोट्या रागात पाहिलं . तिने  लगेच जीभ चावली ... " सॉरी ... सॉरी... " हे बोलताना ती लहान मुलीसारखी वाटत होती... मला मनातल्या मनात हसायला आलं...
_" आपण तिथे बसुया ... वाळूवर ?? " तिने बोटांनी वाळूची जागा दाखवली.....तिथे जास्त गर्दी नव्हती . आम्ही तिथे जाऊन बसलो... तिच्याबरोबर असं एकांतात बसायला खूप बरं वाटत होतं ... हिंदी पिक्चर मधले नायक नायिका एकत्र आले कि गाणी म्हणत का नाचतात ..? याचा उलघडा मला आज होत होता....पूर्वी मला तो मूर्खपणा वाटायचा.....समोर उधाणलेला समुद्र .... त्यावरून येणारा गार वारा ...पायाखाली लागणारी उबदार वाळू ... अस्ताला जाणारा सूर्य .... आणि बाजूला बसलेली सुंदर तरुणी.....आणखी काय पाहिजे...????
_" तू बोलत का नाहीस?? " तिच्या आवाजाने माझं विचारचक्र थांबलं.....
_" नाही.... काही नाही असंच.... " मी म्हणालो... त्यानंतर ती वाळूवर बोटांनी रेघोट्या मारत बसली.....' मूर्खा काहीतरी बोल... ' मी मनात कोणत्या विषयावर बोलायचं याचा विचार करू लागलो.....
_" ए तुझं गाव कोणतं ?? तुला पूर्वी इथे कधी बघितलं नाही ..." ती विचारत होती...
_" मी मुंबईचा आहे ... इथे जॉब करतो..."
_ " जॉब ... आणि इथे ?? लोक मुंबईत जाऊन जॉब करतात... आणि तू ते सोडून इथे गावात काय करतोयस ?? " तिच्या विचारण्यात मिश्कीलपणा आणि आश्चर्य ह्याचं मिश्रण झालेलं दिसलं..
_ " माझी आई पण मला हेच म्हणते..." मी तिच्या बोलण्याला दुजोरा दिला...
--" पण इतकं काही खराब नाही हं आमचं गाव..." तिने लगेच आपल्या गावाची बाजू घेतली...
-- " ते तर दिसतंच आहे ...." हे वाक्य मी मिश्किलपणे तिच्या डोळ्यात पहात म्हणालो ....तिने हसून नजर दुसरीकडे वळवली...थोडी लाजल्यासारखीही वाटली मला ...पण तिच्या डोळ्यात पाहिलं ना कि काळ थांबल्यासारखा वाटतो...अल्बर्ट आईनस्टाईनला रीलेटीव्हिटी चा शोध असाच काहीसा लागला असणार ..... हे काय मधेच डोक्यात आलं ?? स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या भांडवलावर ह्या अशाच प्रकारच्या उपमा सुचणार ....पण उपमा कशीही असो , त्यामागची भावना महत्वाची.... !!! मग मी पण समोर पाहू लागलो... समोर काही अंतरावर दोन लहान मुली वाळूचा किल्ला बनवत होत्या ...
--" बचपन में हम लोग भी समंदर किनारे ऐसेही घर बनाते थे ... खूब मझा आता था .... " ती हरवल्यासारखी बोलत होती...ती हिंदीत बोलायला लागली कि रणरणत्या उन्हात एखादी थंडगार वाऱ्याची झुळूक आल्यासारखी वाटते .... एक नजाकत का काय म्हणतात ते होतं तिच्या हिंदीत...नाईतर आमची बम्बैया हिंदी...!!
_" तुमको तुम्हारा बचपन अभी भी आठवता है क्या ?? " मी आपला मराठीचा तोडक्या मोडक्या हिंदीत स्वैर अनुवाद केला..
_ " हां ..... और एक बात बोलनी थी तुमसे ...." ती म्हणाली...
-- " क्या?? " आता समोरची व्यक्ती हिंदीत बोलतेय म्हटल्यावर मी पण हिंदीतच विचारलं ...
_ " तुम हिंदी मत बोला करो .... तुम्हें नही आती...." असं म्हणून ती खुदुखुदू हसायला लागली... लहान मुलीसारखी.... . माझा चांगलाच ' वडा' केला तिने ...तिचं ते हसणं पाहून मलाही हसायला यायला लागलं....बराच वेळ आम्ही हसत होतो....
-- " आपण काही खाऊया का?? ...." मी तिला विचारले...
-- " भेळपुरी ... मला खूप आवडते..." ती उत्साहित होऊन म्हणाली... ' अरे वा... भेळपुरी तर मला पण आवडते.....आमच्या दोघांच्या आवडी निवडी जुळतात तर....!!! '
भेळपुरी खात असताना अचानक काही वेळाने आमच्या मागून एक गाणं ऐकायला आलं ....' बम्बैसे आया मेरा दोस्त .., दोस्त को सलाम करो.....' आवाज ओळखीचा वाटला मला ..... माझं डोकं पूर्वी ऐकलेल्या ध्वनिफिती तपासण्याच्या कामाला लागलं ..... अरे देवा !! हा तर उम्याचा आवाज .....मला जोराचा ठसका लागला.... .हळूच मागे पाहिलं तर उम्या आणि आनंद एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फिरत होते...... झालं कल्याण....! ऑफिसमधे मुंबईवरून आलेल्या मित्राची मारलेली थाप हेडक्लार्क बाईंच्या पचनी पडली असेल , पण आमच्या ह्या दोन दानवांना मी काही फसवू शकलो नव्हतो..... आता हे साले तिच्याबद्दल विचारून विचारून माझं डोकं खाणार.....माझं जीना हराम करणार....आता काही खरं नाही .... आमचं खाऊन झालं... अंधारही पडू लागला होता....
-- " मी जाऊ आता , उशीर झाला खूप....." ती विचारत होती...
-- " थांब ना अजून थोडा वेळ...." मला तर तिने जाउच नये असं वाटत होतं.
-- " नाही... नको, अम्मी ओरडेल.... "
-- " परत भेटशील ना...." मी जरा अडखळतच तिला विचारलं .
-- " बघेन.... बाय ..." असं म्हणून ती निघून गेली..... ती निघून गेली खरी.... पण माझं महत्वाचं असं काहीतरी तिच्याबरोबर घेऊन गेली... माझं हृदय ....!!!