Saturday, September 24, 2011

......आसमाँ ..... भाग -९ ....

         तारा उद्यानमधे घडू नये ते घडल्यानंतर  तिचा  परत ना फोन आला , ना  मेसेज...!  मी  मधे  एकदा फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोन स्विच्ड ऑफ येत होता.  आता तिच्याशी संपर्काचं साधनच बंद असल्याने माझाही नाईलाज झाला ..... हे सगळं त्या साल्या फिरोजमुळे झालं होतं....मला खर तर त्याचा जाम राग आला होता .... पण मी काय करू शकणार होतो ...??  सगळं व्यवस्थित झालं तर मी फिरोजला बिनधास्त ' साल्या ' म्हणू शकणार होतो , .मला ह्या विचाराने गंमत वाटली .... पण मकरंद शेठ  ही गोष्ट इतकी सोप्पी नाही.....
         त्यानंतर एके दिवशी  आसमाँ मला अनपेक्षित पणे भेटली ... त्याचं झालं असं कि , आमच्या ऑफिस चे कदम साहेब ३१ मे ला रिटायर्ड होणार होते . कदम साहेब म्हणजे एकदम राजा माणूस ....!! आम्ही ऑफिस ला जॉईन झाल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी आम्हाला नेहमीच मित्रत्वाच्या नात्याने वागवलं  , ते आम्हाला आमचे साहेब कधी वाटलेच नाहीत .... ३१ मे ला त्यांचा निरोप समारंभ जोरात करायचा  आणि आमची आठवण म्हणून त्यांना एखादं चांगलंस गिफ्ट देण्याचं ठरलं... मी आणि उम्या त्या कामाला लागलो... सोनगीरीच्या बाजारात आम्ही फिरत होतो ... एक घड्याळाच दुकान दिसलं . आत शिरलो... म्हणलं बघू तरी एखादं चांगलं घड्याळ मिळतं का ते .... !
-- "  आम्हाला  चांगलं रिस्ट वॉच पाहिजे भेट देण्यासाठी ..."  उम्या दुकानदाराला उद्देशून म्हणाला. 
--" हि पहा.... इथे सगळ्या कंपन्यांची घड्याळे आहेत ..." तो समोरच्या आडव्या शोकेस वरच्या काचेवर बोट फिरवत म्हणाला.. आम्ही ती घड्याळे  बघण्यात मग्न झालो...इतक्यात ....
-- " भाभी , ये घडी देखो ... अच्छी है... " उम्या उभा होता,  त्यापलीकडून आवाज आला ... तो कानी पडला आणि अचानक मेंदूतल्या सगळ्या पेशी जागृत झाल्यासारख्या वाटल्या मला ...., मी मान वळवून पाहिलं तर आसमाँ  स्मितहास्य करत माझ्याकडेच बघत होती . हरवलेला  एखादा मौल्यवान दागिना अनपेक्षितपणे  परत सापडल्यावर होतो तसा आनंद मला तिला  बघून झाला . ती अशी अचानकपणे भेटेल ह्याची कल्पनाच  नव्हती मला.... जवळपास महिन्या- दीडमहिन्याने मी तिला बघत होतो . मी काही बोलणार इतक्यात तिने डोळ्यांनीच ' नको ' म्हणून सांगितलं. तिच्याबरोबर तिची भाभी होती . मग मी पण समजून शांत राहिलो...
--"  नै रे ... उसका बेल्ट अच्छा नाही ...." आसमाँच्या भाभीचा मंजुळ आवाज आला . तो इतका मंजुळ होता कि उम्यानेही त्या दिशेने पाहिलं आणि पाहताच राहिला ...आता आमच्या दोघांचही लक्ष घड्याळावरून  उडालेलं होतं.... दुकानात आलेले हे दोघे टाईम पास करण्याच्या उद्देशाने आले असावेत अशी शंका येऊन दुकानदाराने आम्हाला विचारलं , " कोणतं घड्याळ दाखवू तुम्हाला ??..." त्याच्या प्रश्नाने मी भानावर आलो.. ..
--" अं.... हो.... हे पांढऱ्या डायलवालं दाखवा...." मी कोणत्यातरी एका घड्याळावर बोट ठेवत म्हणालो... दुकानदाराने लगेच ते घड्याळ काढलं आणि माझ्या समोर ठेवलं. 
--" ठीक आहे ना रे उम्या ...? " मी त्याला म्हणालो तर त्याचं अजूनही तिकडेच लक्ष होतं ...मी त्याला पायानेच खुणावलं 
-- " हं .... हो हो मस्त आहे .... काय  किंमत ह्याची ..? तो भानावर येत म्हणाला ....
-- " ५४९९ /- फक्त ...." दुकानदाराने  घड्याळाची किंमत ५ रुपये असल्यासारखी सहज सांगितली... उम्याने आणि मी एकदमच एकमेकांकडे पाहिलं... दुकानदाराला बहुतेक ते कळलं असणार... त्याने लगेच आगाऊपणे दुसरं घड्याळ काढलं ... " हे घ्या ३९९/-  चांगली कंपनी आहे ...." 
-- " ह्याच्यापेक्षा जरा  चांगलं दाखवा...." दुकानदाराने आपली इज्जतच काढली असा विचार करून उम्या थोडा वैतागूनच म्हणाला... त्यानंतर त्याने भरमसाठ घड्याळे आमच्या समोर ठेवली. उम्या ती बघू लागला... मी आसमाँ कडे बघून जमेल तशा खाणाखुणा करू लागलो  .... माझा मोबाईल दाखवून तिचा फोन बंद आहे का हे खुणेनेच विचारलं ...तिने तिचा फोन दाखवत ..'चालू आहे ' असं दर्शवल...
--" अरे, आपल्या चव्हाणबाई पण पुढच्या महिन्यात रिटायर्ड होणार आहेत ना ...त्यांना पण बघू एखादं लेडीज घड्याळ... "  उम्याच्या  बोलण्याने  मी भानावर आलो.. मला कळेना कोण चव्हाणबाई ते ? .... मी त्याला तसं विचारणार तोच त्याने मला डोळा मारला ... मी काय समजायचं ते समजलो... आणि शांत राहिलो... आता आम्ही आमचा मोर्चा लेडीज घड्याळांकडे वळवला...
--" ते मरून  कलरचा पट्टा असलेलं घड्याळ दाखवा हो...." उम्या दुकानदाराकडे बघत म्हणाला . आता तर त्याची पक्की खात्रीच पटली कि आम्ही टाईम पास करणार म्हणून ...त्याने थोड्या रागातच ते घड्याळ काढून दाखवलं. उम्या ते बघू लागला तेवढ्यात मी आसमाँकडे पाहिलं आणि हाताने माझ्या दाढीवर हात फिरवत तिच्या भावाबद्दल खुणेनेच ' कुठे आहे ?'  असं  विचारलं ...  मला शंका होती कि तिला हे कळेल कि नाही ... पण तिने लगेच ' तो परत  गेला ' असं खुणेनेच सांगितलं .... मला एकदम बरं वाटलं...
-- " कसं  आहे रे हे ... ?? " उम्या मला ते लेडीज घड्याळ दाखवत म्हणाला...
--" हं... छान आहे ... शोभून दिसेल त्यांना...." मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. 
--" खरं तर त्यांनाच काय, पण कोणालाही शोभून दिसेल हे घड्याळ...." हे वाक्य उम्या मोठ्या आवाजात का म्हणाला ते कळलं नाही... पण त्याला अपेक्षित असा परिणाम मात्र झाला ... आसमाँच्या भाभीचं त्या घड्याळाकडे लक्ष गेलं...
-- " आसमाँ , देख.  ये घडी भी अछी है...." तिची भाभी तिला म्हणाली.... आणि उम्या जवळ येऊन तीही ते घड्याळ पाहू लागली...
--" लेकीन भाभी ...ये घडी तो उन्होने पसंद कर ली है..." आसमाँ तिच्या भाभीला म्हणाली.  आम्ही कशाला जातोय ते लेडीज घड्याळ खरेदी करायला...??  पण उम्याने लगेच उदारता दाखवली ....
-- " नो प्रोब्लेम ... आपको अछी लगी तो आप रख लीजिये ....."  उम्या एकदम हळुवार आवाजात म्हणाला... कोणत्याही सुंदर स्त्रीशी बोलताना त्याचा आवाज असाच एकदम मऊ होतो , हे मला माहित होतं . उम्याने त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लगेच त्या दोघींशी बोलणं सुरु केलं .... उम्या म्हणजे शोले पिक्चर मधला विरू आहे... ' जहाँ लड़की देखा, लाईन लगाना चालू...'  दुकानदाराने तो प्रकार पाहिला , त्याने लगेच सगळ्यांची गाडी रुळावर आणली... " काय करू ...? देऊ का हे घड्याळ....?? " 
-- " क्या किमत है इस्की...??"  आसमाँची भाभी  दुकानदाराला विचारात होती ...
-- " अं ... ६९९/-  " त्याने घड्याळामागची किंमत वाचून दाखवली... त्यानंतर उम्या,  आसमाँची भाभी आणि दुकानदार ह्यांच्यात किमतीवरून घासाघीस सुरु झाली...  इकडे मी विचार करत होतो कि आसमाँला कुठे आणि कसं भेटायचं ते ...? पण आता तर तिच्याशी बोलताही  येत नव्हतं.... काय करू ....?? तिला कसं सांगू...??  मी विचारात असतानाच माझ्या मोबाईलचा मेसेज टोन वाजला ... मी तो बघीतला तर आसमाँचाच मेसेज...
hello , what r u thinking...?? 
now , we can meet ...
मेसेज वाचून मी वेड्यासारखा तिच्याकडे बघतच राहिलो... तिने माझ्या मनातला विचार बरोबर ओळखला  होता. आणि मुख्य म्हणजे , मघाशी तिने तिचा मोबाईल चालू आहे,  असं खुनावूनही माझं  डोकं चाललं नाही . चला ....  बरं  झालं.... आता मला कशाचीही फिकीर नव्हती .... मी मानेनेच तिला होकार दिला .... आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून हसलो...  इकडे वाटाघाटींना यश येऊन घड्याळ ६०० रुपयांना द्यायला दुकानदार तयार झाला ...खरेदी झाली . आम्ही  दुकानाबाहेर आलो  ...' अच्छा हुआ आपने भी बोला किमत कम करने को...  ' वगैरे आसमाँची भाभी उम्याला म्हणत होती... मी आसमाँकडे पाहून ' फोन करतो नंतर ' अशी खून केली. त्या दोघी निघून गेल्या .... उम्या अजूनही त्यांच्याकडेच बघत होता ...
-- " चला.... मान मोडेल आता..." मी त्याला गमतीने एक टोमणा मारला ....
-- " हाय ... काय आहे यार ती....! कट्यार काळजात घुसली....!! " उम्या एकदम फिल्मी स्टाईलने म्हणाला.  मला एकदम भीतीच वाटली ... ह्याला आसमाँ आवडली कि काय...?? अरे देवा ... एक फुल दो माली ...?? आता काय करायचं....?? 
-- " कोण... ती मुलगी का ...?? " मी त्याला सावधपणे विचारलं त्यात थोडी चिंतेची झाक होती...
-- " ती मुलगी पण बरी आहे .... पण तिची भाभी मला जाम आवडली....हाय ....! " उम्या मिश्किलपणे माझ्याकडे बघत म्हणाला... मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला आणि सुटकेचा निश्वास टाकला... काय म्हणायचं आता ह्या उम्याला ...!

Saturday, September 17, 2011

...... आसमाँ.... भाग - ८ .....


त्या  दिवशी ऑफिस मधे असताना आसमाँचा  मेसेज आला 
can we meet today...??
हा मेसेज वाचून मला तर खूपच बरं वाटलं ... खरं तर मला पण सोनदुर्गावरच्या त्या बेधुंद भेटीनंतर तिला पुन्हा भेटावसं वाटतं होतं. आणि योगायोगाने  आज तिचाच मेसेज आला.
 Definatly..... where...? when...??
मेसेज पाठवून मी रिप्लाय ची वाट बघू लागलो...,
 u decide....
ती माझ्यावर सोडून मोकळी झाली ... ठीक आहे ....कुठे भेटूया....?? मी सोनगिरीतली काही चांगली ठिकाणं आठवण्याचा प्रयत्न करू लागलो...एक बाग होती....अगदी उंचावर.... तिथून खाडी आणि दूरवर समुद्र दिसायचा...बरीच जोडपी जातात तिथे... ओके ... तिथेच भेटू....
hmmm.....Tara Udyan...?? 6 p.m. is it ok...??
तिच्या होकार आला .... मग मात्र माझं कोणत्याच कामात लक्ष लागेना ... कधी एकदा ते पकाऊ ऑफिस सुटतंय अस  मला झालं...पावणे सहाला ऑफिस मधून निघालो.... आनंद आणि उम्याला तर मी कलटीच  दिली... तारा उद्यान ला पोहोचायला मला ६:१५ झाले ...पण ती तिच्या नेहमीच्या वेळेपेक्षा उशीरच येणार ह्या अपेक्षेने मी तिथे पोहोचलो तर बाईसाहेब आधीच हजर....! पण तिने आज बुरखा घातला होता ... माझं मन एकदम खट्टू  झालं ...
-- " काय हे ....किती उशीर....?? " ती लटक्या रागात म्हणली...
--" आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं...?? तू आणि चक्क लवकर...?? " मी पण तिची गंमत केली...त्यावर ती मोकळेपणाने हसली 
-- " आज हे का घातलस...?? " मी तिच्या बुरख्याकडे पहात म्हणालो... 
--" अरे मी जरा अम्मी बरोबर बाहेर गेले होते... मला पण नाही आवडत , पण काय करणार...?? " ती नाईलाजाने म्हणाली. मी समजुतीने मान हलवली 
-- " मग...? त्या दिवशी काय झालं घरी गेल्यावर...?"  मी विषय बदलला...
-- " कधी..??"
-- " सोनदुर्गाच्या रात्रीनंतर ?"  
-- " काही नाही .... अम्मीने विचारलं कि मैत्रिणीची आई बरी आहे का म्हणून..." हे सांगताना ती खुदकन हसली. " पण बरं झालं तू मला तसं करायला सांगितलस , नाईतर माझं काही खरं नव्हतं ..." 
-- " जाऊ दे , तो विचार सोडून दे... , आज तू खुशीत दिसतेस....?? "  तिला भेटल्यापासून मला हे जाणवत होतं.
-- " हो.... वाढदिवसाच्या दिवशी कोणता माणूस दुखी असतो....?? " तिने मिश्किलपणे विचारले..
-- " काय... ?? म्हणजे आज तुझा वाढदिवस आहे...?? मग मला आधी का नाही सांगितलस...?? मी काहीतरी गिफ्ट आणलं असतं ना...." मी गोंधळून बोललो....
--" गिफ्टचं काय त्यात ....?? तू आलास तेच खूप आहे माझ्यासाठी...." ती म्हणाली..
--" असं कसं...? काहीतरी द्यायलाच पाहिजे ... " म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागलो... मला फुलांचं एक झाड दिसलं . कोणतं  होतं ते माहित नाही पण फुलं मात्र छानच होती....त्यातल एक फुल मी तोडलं आणि फिल्मी स्टाईलने हिरो हिरोईनला एका गुढग्यावर बसून जसं फुल देतो तसं दिलं.." many many happy returns of the day ..."  त्यावर ती मुक्तपणे हसली...
--" तू फिल्म्स जास्त बघतोस वाटतं...?? " ती हसत विचारत होती...
--" अं... पूर्वी नव्हतो बघत , पण आजकाल बघतो ..." 
--" कोणत्या फिल्म मधे आहे हे असलं....?? " तीने  गमतीने  वरखाली हातवारे  करत  विचारलं 
--" लवकर घे हे फुल ... माझ्या गुढघ्याला खालचे खडे तोचतायत... " मी घाईघाईत म्हणलो .
--" अं ... हं.... आता तर मुळीच नाही ...." ती लाडात येऊन म्हणाली .
--" अगं बाई  माझ्यावर दया कर... " मी काकुळतीला आलो  . खडे चांगलेच टोचत होते... ज्या लोकांनी हे केले आहे त्यांनाच त्या वेदना कळू शकतील..शेवटी तिला माझी दया आली आणि हसत हसत  तिने ते फुल घेतलं ... मी कसाबसा पायावर उभा राहिलो...पिक्चर मधे साले हे काही पण फालतू  दाखवतात .... त्याचं अनुकरण चांगलंच भोवलं मला ....
-- " हे माझ्यासाठी सगळ्यात चांगलं गिफ्ट आहे ... " ती  समाधानाने त्या फुलाकडे बघत म्हणाली...मी तिच्या जवळ गेलो..
-- " मला तू खूप आवडतेस...." मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो. 
--" मला पण...... " ती काही म्हणणार इतक्यात मागून " आसमाँ....." जोरात ओरडण्याचा आवाज आला. आम्ही दचकून मागे पाहिलं... एक ३० -३२ वयाचा तरुण  उभा होता , उंची जवळपास ६ फुट , घारे डोळे ,  वर्ण गोरा ,  कोरलेली दाढी , आणि दोन भुवयांच्या मधे कपाळावर  एक काळा डाग  पडलेला  होता . त्याच्या मागे आणखी दोघे जण उभे  होते. ते पण त्याच्यासारखेच खुनशी वाटत होते .  त्या माणसाचे डोळे रागाने लाल झालेले भासले मला ...
-- " भैया ....... " आसमाँच्या तोंडून एक अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली...तिच्या हातातलं मी दिलेलं फुल केंव्हाच खाली पडलं होतं.....मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला... हा तिचा कतारला राहणारा भाऊ होता,  ज्याविषयी तिने मागच्या भेटीत सांगितलं होतं.... तिच्या भावाची  खाली आमच्या हातांवर नजर पडली ... अगदी चटका लागल्यासारखे आमचे हात एकमेकांपासून विलग झाले ...त्याच्या नजरेत ताकदच होती तशी...!
--" क्या है ये....??" तो एकदम भडकून म्हणाला ...
-- " फि ... फिरोज भैया .., ये.. मेरा.. दोस्त है ..." तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते ...
--" चूप...! " तो एकदम जोरात ओरडला .   तिचा भाऊ  खुनशी  नजरेने    पाहत  माझ्या जवळ  आला . त्याच्या डोळ्यात  जाळ  पेटलेला  दिसत   होता . 
--" नाम क्या है तेरा ...? " त्याने थंडपणे उच्चारलेलं हे वाक्य क्रोधाने भरलेलं होतं...
-- " मकरंद  .... मकरंद  मोहिते  " मी अडखळत  म्हणालो ...
--" करता  क्या है तू ....?? " त्याने पुन्हा  खुनशी प्रश्न  केला  
-- " मी जॉब  करतो  ... महाराष्ट्र  गव्हर्मेंट मध्ये " मी हे का बोललो ते   कळलं  नाही , कदाचित  मी कोणी  असला  तसला  नाही हे मला सूचित  करावसं वाटलं...
--" भैया ...इन्होनेही मेरी जान बचाई थी.... उस दिन ..."  आसमाँ काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली तसा त्याने एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला... फिल्मची रीळ मधेच खटकन तुटावी तशी ती शांत झाली...फिरोजने  माझ्याकडे त्याच रागात पहिले ,
--" अगर तुने फिरसे आसमाँसे मिलनेकी कोशिश कि तो मुझसे बुरा की नही होगा..." त्याने शांतपणे उचारलेल  हे वाक्य एखाद्या हिंदी फिल्मच्या व्हिलनच्या तोंडचा डायलॉग वाटला मला ... 
--" पण मला आवडते ती....मी तिला कधीही फसवणार नाही...." माझ्या तोंडून बाहेर पडलेल्या ह्या वाक्यावर माझं मलाच आश्चर्य वाटलं ...खरच ... प्रेमात खूप ताकद असते म्हणतात ...!!! त्यावेळी मला तिच्या भावाची भीती वाटत नव्हती , कारण माझी भावना खरी होती. मी हे बोलल्याबरोबर  त्याच्या मागे असलेले दोघेजण माझ्या अंगावर धावून आले.. , पण फिरोजने त्यांना अडवलं . 
-- " तुझे मैं आखरी  बार बोल रहा हुं...." त्याच्या डोळ्यातून आता आग बाहेर येईल कि काय असं वाटलं.
 ... त्याने आसमाँचा हात पकडला आणि तिला खेचतच घेऊन जाऊ लागला...मी मात्र हतबल होऊन पाहत राहिलो...मी काहीही करू शकलो नाही ..... आसमाँने जाता जाता मागे वळून पाहिलं... तिच्या डोळ्यांतून निघालेले अश्रू क्षणभरच मला दिसले....