शनिवार, २७ जून, २०१५

लोकल डायरी -- १८

 http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html  लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२ 
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३


http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
                        
             सावंतांनी  त्यांच्या  घरी शकुंतलाबाईंबद्दल सांगून गडावरचे परतीचे दोर कापून टाकले होते . आता त्यांच्या पुढे कोणताच पर्याय उरला नव्हता . जे होईल ते बघत रहाणे इतकंच त्यांच्या हाती उरलं होतं .
" कशाला इतकी घाई केलीत ...?  आपण दूसरा कोणता तरी मार्ग शोधला असता . " मी काल त्यांना म्हणालो तर ते म्हणाले होते की , " मला माझ्या बायकोपासून काहीही लपवायचं नाही . शकुंतला कोण आहे , ती सध्या काय करते , आता तिच्यावर काय प्रसंग ओढवलाय ,  मला शाळेत असताना आवडायची   वगैरे सगळं सांगितलं … " मी डोक्याला हात लावला .
" मग तुमच्या मिसेस काय म्हणाल्या  ? " मी काळजीत विचारलं होतं .
" काही नाही ....  ती त्या क्षणापासून माझ्याशी बोलली नाही ..."  खिन्न चेहऱ्याने ते म्हणाले होते . हे होणं अपेक्षितही होतं . कुठलीही सामान्य गृहिणी ह्यापेक्षा वेगळी वागली नसती .  त्या तरी शांत राहिल्या होत्या  दुसरी एखादी भांडकुदळ बाई असती तर घर डोक्यावर घेतलं असतं .
आज सावंत प्लेटफार्मवर आले तेव्हा त्यांचा चेहरा सुकलेला दिसत होता , ह्याचा अर्थ त्यांच्या मिसेसने अजुन अबोला सोडला नव्हता . आमचा सगळा ग्रुप जवळच असल्याने  मी नजरेनेच ' कसं काय ? ' विचारलं . त्यावर त्यांनी नैराश्येने मान हलवली . मी त्यांना बाजूला घेतलं .
" त्या बोलल्या नाहीत तर तुम्ही बोला ना ... "
" मी हे केलं नसेल असं तुला वाटतं का ? हरतर्हेने बोलायचा प्रयत्न करतोय पण ती काही बोलतच नाही . " ते कळवळून सांगू लागले .
" त्या शांत आहेत ते एक बरं आहे . दूसरी कोणी असती तर भांडाभांडी केली असती . "
" अरे तोच तर प्रॉब्लेम झालाय , ती माझ्याशी भांडली असती तर बरं झालं असतं . ती काहीच बोलायला तयार नाही . आणि तेच जास्त भयानक वाटतंय मला . "
" ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ... "
" त्याचीच तर भीती वाटतेय ना बाबा ... " सावंत हे बोलत असतानाच  भरत तिथे आला. आणि आमचं बोलणं अर्धवट राहिलं . इतक्यात गाडीही आली . आमच्या ग्रुपमधे बाकीच्यांना बसायला जागा देऊन  मी आणि भरत उभे राहिलो .  मी पलीकडे पाहिलं  तर सावंतांच्या टेंशनचं कारण समोर उभं असलेलं दिसलं . त्याही थोड्या निराश असल्यासारख्या मला वाटल्या .  त्यांच्याच बाजूला अँटी व्हायरस  उभी होती .  तिने  नेहमीसारखी  माझ्याकडे बघुन ओळखीची स्माईल दिली . उन्हाळ्यात पहिला पाऊस पडल्यावर वाटतं तसं मला वाटलं . आजकाल मी जास्त विचार करणं सोडून दिलंय , तिची एंगेजमेंट झालीय , काही दिवसांनी लग्नही होईल . घडणाऱ्या गोष्टी कितीही प्रयत्न केल्या तरी घडणारच ...! मग त्या बाबतीत विचार करुन आपला आत्ताचा काळ का बिघडवा ...? आपण आपलं मस्त राहावं ... आत्ताच्या ह्या घडीला मी तिला मन भरुन  बघत होतो , आणि हेच सुखद होतं . मला अचानक जूली फिल्ममधलं ते गाणं आठवलं , ' रोक नहीं सकती नजरोंको , दुनिया भर की रसमें .... ' वा .... काय ओळी आहेत .... मस्तच ...! माझ्या कानात ती ऑडियो वाजायला लागली .   मी एकदम आनंदात डुलतोय   हे मात्र  भरतच्या नजरेतून सुटलं नाही . थोड्याच वेळात तो माझ्या कानापाशी आला  , " काय शारूख , काय चाल्लंय आजकाल … ? "
" काय ? " मला समजत होतं तो असं का म्हणतोय , पण मी न समजल्यासारखं दाखवलं .
" आयला , नाटकं करतोयस काय ? पण ठीक आहे ....  चांगली प्रगती आहे ..."  त्याने नजरेनेच अँटी व्हायरसच्या दिशेने खुणावलं .
" ओह ... तू तिच्या बद्दल बोलतोय का ? ते काही नाही रे बाबा . नुसतीच ओळख आहे ... बाकी काही नाही . आणि तुला तर माहीत आहेच की , तिची एंगेजमेंट झालीय ती ...! " मी त्याचा गैरसमज ( ?)  ,  जो बरोबर होता तो दूर केला.
" मला काय तुझी लक्षणं ठीक दिसत नाहीत . " भरत संशयाने बघत म्हणाला .
" बरं बाबा , तुला वाटतं तसंच आहे ... खुश ...! " समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देता येत नसेल तर  कंटाळून वापरायचं वाक्य मी त्याच्यावर फेकलं . तो पुढे जास्त काही बोलला नाही. पण थोड्या वेळाने तो पुन्हा माझ्या कानाशी आला . ," काय रे ? सावंतांचा काही प्रॉब्लेम झालाय का ? "  तो हे बोलला आणि मी उडालोच ! ह्याला कसं कळालं ? मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला , मघाशी आम्ही बोलत असताना भरत आमच्याकडे पहात होता .   भरतने सावंतांचे लीपस् रीड केले होते . हा  तर खुपच घातक   प्रकार होता .  म्हणजे आता लांब जाऊन बोलायचीही सोय राहिली नाही .  पण त्याला मुख्य मुद्दा काय आहे ते कळलं नव्हतं , हे फार बरं झालं . मी त्याला काय सांगायचं याचा विचार करत असतानाच त्याने पुन्हा मला विचारलं .
" काही नाही रे ... त्यांचा घरगुती काहीतरी प्रॉब्लेम आहे ... आपण कशाला मधे पडा ? त्यांचं ते  बघुन घेतील ... आणि आपल्याला प्रॉब्लेम्स काय कमी आहेत ... काय ? " मी असं काहीबाही बोलून  त्याचा विचार दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला .
" हो ना यार ... जाऊ दे ... पण तुझं ठीक चाललं आहे ना ? " भरत तसा भोळसट आहे ... त्याला आत्ता माझाच  काहीतरी झोल चालू आहे असा संशय होता  आणि सावंतांवरुन त्याचं लक्ष दुसरीकडे खेचण्यासाठी मीही त्याला अपेक्षित असंच उत्तर दिलं ... त्याचं समाधान झालं . मी पुन्हा अँटी व्हायरसचा विचार करु लागलो . आज आपण  तिच्याशी स्वतःहुन बोलुया का ? असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला . पण बोलणार काय ?  आपण सावंतांचा प्रॉब्लेम तिच्याशी शेयर केला तर  ?  एखादी बाई ह्या प्रश्नाकडे कशा दृष्टिकोणातून पाहील ? किंवा तिची काय मतं असू शकतील अशा प्रसंगावर ?  हे मला जाणून घ्यायचं होतं . आणि असंही आता तिच्याशी बऱ्यापैकी ओळख झाली आहे .  त्या विचारानेच मला एकदम हुशारल्यासारखं वाटू लागलं . भायखळ्याला ती उतरल्यावर समोर येईल अशा बेताने मी लोकलमधून   उतरलो .
" हाय ... " नजरानजर झाल्यावर मी म्हणालो  .
" ओ  हाय  ... कसे आहात ? ” तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं  .
" मस्त ... आणि तुम्ही ? "
" मी सुद्धा ...  तुम्ही जॉब बदलला का ? " तिने विचारलं .
" नाही , तोच आहे ... पण तुम्हाला असं का वाटलं ? "
" नाही , काल परवा  तुम्ही  आपल्या स्टेशनवर उतरला नाहीत  , म्हणून वाटलं असं .... " मग माझ्या लक्षात आलं की मी सावंतांच्या बरोबर पुढे सी एस टी ला  गेलो होतो . म्हणजे तिच्या लक्षात होतं तर .... ! आपल्या नकळत आपली आवडणारी व्यक्ती आपल्याबाबत विचार करते ह्यासारखी सुखद भावना दुसरी कुठली नसेल , आणि मी जे विचारणार होतो त्याची सुरवात तर तिनेच करुन दिली ... वा ! हे बाकी चांगलं जुळून आलं .
" एक्चुली , आमच्या ग्रुपमधले सावंत , त्यांचा एक प्रॉब्लेम झाला होता , त्यामुळे गेलो होतो . "
" कसला प्रॉब्लेम ? ..... नाही म्हणजे  काही पर्सनल असेल तर सांगितलं नाही तरी चालेल ..."
" नाही तसं काही नाही , तुम्हाला थोडा वेळ आहे का ? "
तिने घड्याळात पाहिलं ." हो आहे थोडासा , असंही आमचे बॉस तसे चांगले आहेत . थोडा उशीर झाला तरी काही बोलत नाही " आता इतक्या सुंदर मुलीला  थोडासा  उशीर झाल्याबद्दल ओरडणारा बॉस एकतर मुर्ख तरी असेल किंवा आंधळा तरी असेल .
" मग ... बन मस्का आणि चहा ... ? " मी विचारलं .
" अम् ... चालेल .... " आम्ही आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंटमधे आलो . हल्ली आम्ही तिथे जायला लागल्यापासून काऊंटरवरचा शेठ चेहऱ्यावर एक औपचारिक हास्य आणतो आणि ऑर्डर घेणारा पोरगा न सांगता बन मस्का आणि चहा घेऊन येतो . आता काय बोलायचं ह्या लोकांना ...! पण ही सगळी जादू अँटी व्हायरसची आहे हे मला माहित आहे . नाहीतर माझ्यासारख्या ओबडधोबड माणसाला कसली आलीय  एवढी व्ही आय पी ट्रीटमेंट मिळायला ...! आम्ही दोघे एका गोल टेबलापाशी बसलो .
"  हं ... बोला ... "  मी काय बोलणार ह्याची उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती .
"  तुम्हाला मी एक सिच्युएशन  देतो ,   समजा  , तुमचं लग्न झालं आहे . आणि तुमचे मिस्टर एक दिवस तुम्हाला सांगतात की पूर्वी   त्यांचं एका स्त्रीवर  प्रेम होतं .  आता ती त्यांच्या आयुष्यात परत आली आहे .  आणि तिच्याबरोबर काही असा प्रसंग घडला की आता ती एकटी पडली आहे ... आणि तुमच्या  मिस्टरांना  त्या स्त्रीला आधार द्यावा असं वाटतं . हे तुम्हाला ते स्वतः सांगतात . तर तुम्ही काय कराल ? "
" आधार द्यावा असं वाटतं म्हणजे ? "
" म्हणजे .... समजा ते त्या स्त्रीला तुमच्या घरी घेऊन आले तर ? " मी अडखळत विचारलं .
" काय ? असं कसं घरी घेऊन येणार ? "  ती एकदमच ओरडली ,  जसं काही खरंच असं घडलं होतं . आजुबाजूच्या टेबलवरचे लोक आमच्याकडे बघु लागले .
" हळू ... हळू ... अहो मी फक्त तुम्हाला विचारतोय हो ...  " मी दबक्या आवाजात तिला म्हणालो
" ओह , सॉरी ... म्हणजे ही कल्पनाच विचित्र आहे ...   मीच काय ...  कोणतीही गृहिणी ह्या गोष्टीला तयार होणार नाही . "
" हम्म्म ... तेच  झालंय ... "
" म्हणजे ... हे तुमच्या त्या सावंतांच्या बाबतीत झालंय ? ओह माय गॉड ...!  मग आता ? "
" तेच कळत नाही ना काय करायचं ते ..." मी डोकं धरुन बसलो .
" पण मला हे कळत नाही , ही मुर्खपणाची आयडिया त्यांना सुचली कशी ? "
" त्यांना नाही सुचली ... मीच दिली ही आयडिया ..." मी चुकीची कबुली दिल्याच्या सुरात म्हणालो .
" काय .... तुम्ही ...? " असं म्हणून ती खदा खदा हसायला लागली . इतक्या जोरात की आजुबाजूचे लोक पुन्हा आमच्याकडे बघायला लागले . मला अगदी मेल्याहुन मेल्यासारखं झालं .  मी खरंच वेडेपणा केला होता . अँटी व्हायरस म्हणाली तेच बरोबर होतं .  कोणतीही सामान्य बाई असं करायला तयार होणार नाही .
" ओके ... होतं असं कधीकधी ... मला जसं सुचलं तसं त्यांना सांगितलं ..."  काहीतरी म्हणायचं म्हणून मी म्हणालो . ती अजूनही हसत होती . हसता हसता म्हणाली , " सॉरी ... सॉरी ... एक्चुली मी तुमच्या आयडियावर हसत नाही ... पण ज्या पद्धतीने तुम्ही त्याची कबुली दिली त्यावर मला हसायला आलं ... द्याट वॉज सो इनोसंट...! "  बाकी हसताना ती भलतीच गोड दिसत होती . मी माझं भान हरपुन तिच्याकडे बघत राहिलो . माझ्या मुर्खपणामुळे का होईना ती हसली हेच माझ्यासाठी खुप होतं . हसता हसता अचानक ती थांबली , चावीच्या खेळण्याची चावी संपावी  तशी ! आणि समोर पाहू लागली . ती काय पहाते आहे हे बघण्यासाठी मी त्या दिशेला  पाहिलं ... तिथे एक तरुण उभा होता  आणि थंड नजरेने  तिच्याकडे पहात होता . काळ थांबल्यासारखे ते दोघे एकमेकांकडे पहात राहिले . तो तरुण रागाने माघारी फिरला आणि निघुन जाऊ लागला . अँटी व्हायरस त्याच्या मागे धावली ... "  अनिकेत  थांब .... अनिकेत  प्लीज ... " पण तो तसाच पुढे निघुन गेला . त्याने टॅक्सी पकडली आणि तो गेला . अँटी व्हायरस सुन्न चेहऱ्याने तो गेला त्या दिशेला पहात उभी राहिली . टळटळीत दुपारी सूर्यग्रहण सुरु व्हावं तसं काहिसं झालं . वातावरण एकदम उदास होऊन गेलं . ती उभी होती तिथे मी  गेलो , " कोण होता तो ...? आणि तुम्ही इतक्या गंभीर का झालात अचानक ..." त्यावर ती नकरार्थी मान हलवत म्हणाली ,  " तो माझा होणारा नवरा होता ...अनिकेत … "



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

शुक्रवार, १९ जून, २०१५

लोकल डायरी -- १७

http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२ 
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३

http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६


                            काही गोष्टी अशा असतात की त्या दुसर्यांनी सांगितल्याकीच पटतात .  काल मी सावंतांना बोलून गेलो खरं  की शकुंतलाबाईंना त्यांच्या घरी घेऊन जा म्हणून , पण आता मला मी ही खुप मोठी चूक केल्यासारखं वाटू लागलं . मी सहज बोलून गेलो पण सावंतांनी  सिरिअसली  घेतलं होतं . त्यानंतर ते काहीच म्हणाले नाहीत . विचार मात्र करत राहिले . खरं सांगायचं तर त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात  अशी सुप्त इच्छा आधीपासून  होती . ती  फक्त त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीतरी त्यांना सुचवावी अशी त्यांची मनीषा असावी . पण आता मला त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटायला लागली . काय होईल ज्यावेळी सावंत शकुंतलाबाईंना घेऊन त्यांच्या घरी जातील ? धरणीकंप होईल , प्रलय येईल .... कोणत्या गृहिणीला  आपल्या नवऱ्याने त्याच्या प्रेयसीला घरी आणलेलं चालेल ? कुठून सावंतांना मी हा मार्ग सुचवला असं मला वाटायला लागलं . त्याच विचारात मी प्लेटफार्म नंबर २ च्या पायऱ्या उतरु लागलो . प्लेटफार्मवर आलो . सावंत कुठे दिसतात  ते पाहू लागलो . ते अजुन आलेले दिसत नव्हते . विचारांच्या तंद्रित असतानाच आमच्या ग्रुपच्या शेजारच्या ग्रुपमधले शर्मा माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या हातावर पेढा ठेवला . मी काही विचारणार इतक्यात तेच म्हणाले , " मेरी बेटी दसवी में थी उसे 91 % मार्क मिले ...."
" ओह .... वॉव , काँग्रॅटस  " त्यांचं अभिनंदन करुन टाकलं . मग अचानक आठवलं की आपल्या भडकमकरांचा मुलगा पण दहावीला होता .  काल त्यांना फोन करायचं राहुनच गेलं . काल नाही , निदान आता तरी करु म्हणून मी माझा मोबाईल काढला .  इतक्यात  शरद भरत सुद्धा आले .
" अरे काल दहावीचा रिझल्ट लागला , आपल्या भडकमकरांचा मुलगा पण होता ना ? काय झालं त्याचं ? " मी त्या दोघांना विचारलं .
" अरे बॅड न्यूज आहे यार . त्यांचा मुलगा २ विषयात उडाला  . तू काही विचारु नकोस भडकमकरांना... नायतर वैतागतील उगाच ...! " शरद म्हणाला .
" अरे देवा ... खुप वाईट वाटलं असेल ना रे ..."
" वाईट ...? भडकमकरांना वाईट कधीच वाटत नाही . त्यांना फक्त राग येतो  आणि काल रागाच्या भरात त्यांनी त्यांच्या मुलाला जाम मारलं ..." शरद सांगत होता .
" काय ? त्यांनी मुलाला मारलं ? तो नापास झाला म्हणून ? काय यार .... असं नको करायला पाहिजे होतं त्यांनी "  मला कसंतरीच वाटायला लागलं .  लोकलमधे मारामारी झाल्यावर भडकमकरांचा रुद्रावतार आम्ही बऱ्याच वेळा पाहिला होता . त्यामुळे काल त्यांच्या मुलाची काय अवस्था झाली असेल ह्याची कल्पनाच न केलेली बरी  !
" अजुन आले नाहीत वाटतं " भरत इकडे तिकडे बघत म्हणाला .
" सावंत पण दिसत नाहीत ...."  त्यांचाही  काय निकाल लागणार होता ह्या चिंतेत मी होतो  . इतक्यात गाडी आली आम्ही आमच्या जागा पकडल्या . जिग्नेस आधीच उल्हासनगरहुन डाऊन करुन आला होता . त्याच्या लग्नाचे नव्याचे नऊ दिवस संपले असावेत . सावंत आले . त्यांच्या चेहऱ्यावरुन मला कसलाच अंदाज बांधता येईना . ते आले आणि शांतपणे बसून राहिले .
" क्या सावंत , आज शांत शांत दिख रहा है ! " नायर अंकलनी त्यांना विचारलंच .
" कुछ नहीं नायरजी आज थोडा ठीक नहीं लग रहा ... " असं म्हणून त्यांनी विषय संपवला .  गाडी निघाली आणि भडकमकर आत शिरले . भरत त्यांच्या जागेवर , विंडोत बसला होता . त्यांना बघुन लगेच त्याने त्यांची जागा  त्यांना  दिली . भडकमकर शांतपणे बसले . त्यांच्या उजव्या हाताला बारीकसं बँडेज बांधलेलं दिसलं .
" अरे , भडकमकर साब ,  ये हात को क्या हुआ ...? किधर मारामारी किया क्या ? "  नेमकं चुकीच्या ठिकाणी कसं बोलवं हे फक्त जिग्नेसकडून शिकावं . आम्ही सगळयांनी  भडकमकरांकडे  पाहिलं . ते काय बोलतील ह्याचा नेम नसतो .
" हां ... घरमें ही किया मारामारी .... छोकरे को पीटा ... नापास हो गया दहावी में ... इसीलिए ..." हे बोलतानाही  त्यांचा राग उफाळून येत होता . आम्ही सगळे शांत राहिलो . " दोन विषय जातात .... तेही दहावीत ! काय कमी केलं होतं त्याला ?  माझी ऐपत नसताना महागडा  क्लास लावला .... कधी कुठली गोष्ट पाहिजे की दुसऱ्या दिवशी हजर केली . मला म्हणाला बाबा मला कंप्यूटर घेऊन द्या ... त्याला कंप्यूटर घेऊन दिला . त्यावर अभ्यास करायचं सोडून हा पठ्ठ्या गेम्स खेळायचा. काल त्याचा रिझल्ट बघितला आणि टाळकंच फिरलं माझं . " भडकमकर रागारागात सांगत होते . थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही .
" भडकमकरजी , जो हुआ सो हुआ ... अब रिझल्ट तो आप बदल नय सकते . और लड़का फेल हुआ तो कुछ आसमान नहीं टुटा है । फेल हुआ तो क्या जिंदगी ख़तम नई हुई ... " नायर अंकल समजावणीच्या सुरात म्हणाले .
" लेकिन नायर साब , ये लड़के को मैंने कुछ कम नहीं किया . जो माँगा वो दिया ... तो मैं उससे इतनी सी भी अपेक्षा नहीं कर सकता क्या ? " भडकमकर म्हणाले ह्यावेळी त्यांच्या बोलण्यातला राग बराचसा कमी झाला होता .
" आप अपेक्षा करो , मैं ना नय बोलता ...  लेकिन उसका बोज अपने लडके पर मत डालो . और बच्चोंको मारना पीटना तो  अच्छी बात नहीं जी ..." नायर अंकल समजावत होते .
" हो , बरोबर आहे भडकमकर , कशाला मारलं  बिचाऱ्याला एवढं ... " भरतनेही नायर अंकलची री ओढली .
" मारू नको तर काय त्याची पूजा करू ? अरे आमचा शेजारी त्याच्याच वर्गातला  , त्याच्याच क्लास मधला सुधीर , त्याला 83 % मार्क आहेत . आणि हा ठोंब्या 2 विषयात नापास होतो ...? " त्यांच्या रागाची पातळी पुन्हा वाढू लागली . मुसळधार  पावसाळ्यात नदीची धोक्याची पातळी वाढते तशी !
" भडकमकर , अहो  दहावीत नापास होणारे सुद्धा पुढे खुप मोठे झालेत . कदाचित नंतर त्याला त्याचा मार्ग सापडेल " मी म्हणालो .
" अरे हा कसला मोठा होणार ? फक्त शरीरानेच मोठा होईल , बाकी काही नाही .  माझ्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळवल्या ह्याने ...." भडकमकर अजूनही वैतागलेल्या सुरात बोलत होते . जणुकाही त्यांना त्यांचा मुलगा नकोसा झाला होता .
" भडकमकर , मेरेको ये बताओ की तुमको तुमारे दसवी में कितने मार्क्स ते ? " नायर अंकलनी  हुकुमाचं पान टाकलं , भड़कमकर त्याला कटपी होते हे त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होतं .
" अरे , हमारे टाईम में किधर इतनी सुविधा थी ? क्लास , कॉम्पुटर किधर था …?  " भडकमकर आता पळवाटा शोधु लागले .
" वो तुम मेरेको मत बताओ ... तुमारा दसवी का मार्क्स बताओ ..." नायर अंकलनी भडकमकरांना खिंडीत गाठलं .
" लेकिन ये मेरा मार्क्स कहाँ से आ गया बिचमें ? "
" क्या है ना भडकमकरजी , जो चीजें माँ बाप कर नहीं सकते वही वो अपने लड़का- लड़की से करने की आशा रखते है । तो उसमें उन बच्चों का क्या दोष  ? इसीलिए बोलता हूँ की , अपने बच्चे पे बोज मत डालो . उसे वो करने दो जो उसे पसंद है । तबी वो प्रोग्रेस करेगा ...। " नायर अंकलनी अगदी मोजक्या शब्दात त्यांना समजावलं . भडकमकर शांत राहिले. थोड्या प्रमाणात का होईना  कदाचित त्यांना हे पटलं असावं . ते विचार करु लागले . भडकमकर तसे समजदार होते . आता त्यांना आणखी डोस देण्यात अर्थ नव्हता .  आम्ही थोडा वेळ कुणीच काही बोललो नाही . मी सावंतांकडे पाहिलं . ह्या  सबंध  चर्चासत्रात त्यांनी एकदाही भाग घेतला नाही , की आपले मौलिक मत मांडले नाही . आपल्याच विचारात ते गढुन गेले होते . आणि त्यांचा काय  विचार चालू होता हे फक्त मलाच ठाऊक होतं.   दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची  एखादं गुपित फक्त आपल्यालाच माहीत आहे ही भावना सुद्धा किती सुखद असते . पण मला त्यांच्याकड़े बघुन कसंतरीच वाटत होतं . ते असे बसले होते की भडकमकरांच्या मुलाच्या ऐवजी तेच नापास झालेत . ठाणे आलं , मी उठून भरतला जागा  दिली . समोर अँटी व्हायरस दिसली ,  अन मला तर अगदी मेरिटमधे आल्यासारखं वाटलं . तिने केसात अबोलीचा गजरा माळला होता . मस्त दिसत होती ती !   तिचं आज माझ्याकडे लक्ष गेलं नाही ,  पण तिच्याकडे मधुनच चोरटी नजर टाकायला मजा येत होती हे मात्र निश्चित ! आपापल्या स्टेशन्सवर उतरायला प्रत्येक जण निघाला . नायर अंकल आणि भडकमकर  दादरला उतरणार होते . ते जायला निघाले तेवढ्यात भडकमकरांनी त्यांना थांबवलं ,  " नायरजी ,  थॅंक्यू अँड सॉरी ...."
" थॅंक्यू अँड सॉरी  किसलिये  ? "
" मुझे अपनी गलती दिखाने के लिए थॅंक्यू और   मुझे अपनी गलती समझ आयी ... इसलिये सॉरी !  " नायर अंकलनी त्यांचा  खांदा प्रेमाने थोपटला आणि  घाईघाईने उतरणाऱ्या प्रवाशांच्या रांगेत दोघेही  जाऊन मिळाले … एका नदीचं पाणी दुसऱ्या नदीला मिळावं तसं  पलिकडून येणारी माणसांची रांग आणि अलिकडून येणाऱ्या रांगेचा दरवाज्यात संगम झाला . सगळे उतरले , आता आमच्या ग्रुपचे फक्त मी जिग्नेस  आणि सावंत राहिलो . मी पाहिलं , जिग्नेस  त्याच्या मोबाईलमधे  डोकं  घालून कोणती तरी फिल्म बघण्यात दंग झाला होता . मी सावंतांच्या बाजूला जाउन बसलो . त्यांना त्यांच्या मौनाचं  कारण विचारलं  .  त्यांनी जे उत्तर दिलं  त्यावर मला काय बोलावं  तेच कळेना , ते म्हणाले , “ मी माझ्या बायकोला शकुंतलाबद्दल सगळं  सांगून टाकलं …. “

माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

शनिवार, १३ जून, २०१५

लोकल डायरी -- १६

  http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html  लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२ 
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
                                                           
   " Nighala ka ? " माझ्या व्हॉट्स ऍपवर सावंतांचा मेसेज आला . मग मला अचानक त्यांचं कालचं  बोलणं आठवलं . त्यांना कालच मला काहीतरी सांगायचं होतं . आज लवकर गेलं पाहिजे . म्हणून मी पटापट आवरू लागलो .
"10 minitat pohochto " असा मेसेज त्यांना करुन  टाकला,  आणि निघालो . काय सांगायचं असेल सावंतांना ? इतकं महत्वाचं असं काय आहे की ते काल मला सांगण्यासाठी अधीर झाले होते  ? प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तेव्हा ते एकटेच एका बाकावर बसले होते . मी लांबुन पाहिलं तर मोबाईलमधे डोकं घालून बसलेले मला दिसले. मी त्यांच्या जवळ गेलो.
" हां ... बोला सावंत .... एवढं काय अर्जंट बोलायचं होतं ? "  मला बघुन त्यांना एकदम हायसं वाटलं . " ये ... ये ... बस " ते  बाकड्यावर सरकुन मला जागा करुन देत म्हणाले . ते काय सांगणार ह्याची उत्सुकता मनात घेऊन मी त्यांच्या शेजारी बसलो . थोडा वेळ ते तसेच शांतपणे बसून राहिले . पण त्या शांततेतही त्याच्या मनात खुप मोठं वादळ चालू असावं हे त्यांच्या हाताच्या बोटांची   चाळवाचाळव चालू होती त्यावरुन माझ्या लक्षात आलं . मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला अन म्हणालो , " सावंत , काही प्रॉब्लेम आहे का ? घरी सगळं ओके ना ? " त्यावर त्यांनी चटकन माझ्याकडे पाहिलं . पण नंतर नजर पुन्हा दुसरीकडे वळवली. नक्कीच काहीतरी सिरिअस प्रॉब्लेम झाला असावा .
" तुला कसं सांगू तेच कळत नाही . "  सावंत काळजीने म्हणाले .
" सांगा ना ,काय प्रॉब्लेम झालाय ? "  मी विचारलं तरी सावंत तसेच  शांत बसून राहिले .   "  हे बघा तुम्ही सांगितलं नाही तर मला कळणार कसं ? "
" माझं पहिलं प्रेम पुन्हा माझ्या आयुष्यात आलय...."   त्यांच्या  चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता .  .
" काय ? म्हणजे त्या शकुंतला जोशी ....? " मला काय बोलवं तेच कळेना .
" कोण रे शकुंतला जोशी ...? " शरद माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाला . मी एकदम दचकलोच . खरं तर ही  फक्त सावंतांच्या आणि माझ्यातली गोष्ट होती .  आमच्या न कळत शरदला ही गोष्ट समजली होती का ?
" अरे केव्हढयाने दचकलास ? काय झालं ? आणि ही शकुंतला जोशी कोण ? "  शरदला संशय आलाच .
" अरे ती आमच्या शेजारी राहते , तिचे मिस्टर  सावंतांच्या ऑफिसमधे काम करतात  ..." मी मनाला येईल ते ठोकुन दिलं .
" मग ? तिचं काय ? " शरदने पुन्हा विचारलं . आता त्याला असं उत्तर द्यावं लागणार होतं की त्यातून त्याचे कसलेही उपप्रश्न निर्माण होणार नाहीत . मी  चटकन विचार केला , " अरे , त्यांना कॉस्ट कटिंग  आणि रिसेशनमुळे  काढून टाकलं रे... त्या बिचाऱ्या आमच्याकडे येऊन सांगत होत्या . तेच मी सावंतांना सांगत होतो . " जसं सुचेल तसं सांगितलं  . सावंतांचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता .
" हो यार ... जाम बेकार अवस्था होते , ज्यावेळी सांगतात की तुम्हाला उद्यापासून यायचं नाही ते .... मी पण अनुभवलंय हे आधी . " शरद हळहळ व्यक्त करत म्हणाला . इतक्यात भडकमकर आणि भरत आले . तेही आमच्या इथे येऊन थांबले . मी सावंतांना नंतर बोलू असं खुणावलं. लांबुन गाडीचा हॉर्न  ऐकू आला . सगळे आपापल्या जागेवर बसले . मी आणि सावंत उभे राहिलो . मी पलीकडे व्हिडिओ कोच कडे पाहिलं , शकुंतला जोशी कुठे दिसत नव्हत्या. अँटी व्हायरस समोरच उभी होती . आमचं ओळखीचं स्माईल देऊन झालं . सावंतांनी मोबाईलमधे डोकं घेतलं होतं . मोबाईल ही वस्तु कठीण प्रसंगी  उपयोगाची झाली आहे  . काहीही कारण नसताना आपण मोबाईलशी चाळा करु शकतो . स्मार्ट फोनमुळे तर हे काम आणखी  सोप्पं झालंय . मी  त्यांना काहीच बोललो नाही . मघाशी ते म्हणाले की त्यांचं पहिलं प्रेम त्यांच्या आयुष्यात परत आलंय ... म्हणजे नेमकं काय झालंय ? सावंत त्या बाईंच्या बाबतीत सिरिअस वगैरे नाहीत ना ? तसं असेल तर मोठाच प्रॉब्लेम होईल .  त्यांच्या सुखाच्या संसारात मधेच हे वादळ कसं काय निर्माण झालं  ?  मी सावंतांच्या मिसेस ना एकदा भेटलो होतो . अतिशय सुस्वभावी आणि मन मिळाऊ वाटल्या मला . त्यांच्या संसारात कशा प्रकारची कमतरता मला जाणवली नाही . त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं होती . मुलगा बारावी आणि मुलगी नववीला होती . दोघेही हुशार  आणि  चुणचुणीत , थोडक्यात अभ्यासाच्या बाबतीत  आई बापच्या डोक्याला टेंशन न देणारी अशी मुलं होती . इतकं सगळं सुरळीत चाललं असताना , सावंतांना हे मधुनच कुठून सुचलं ? अशा ह्या चौकोनी कुटुंबात आणखी एक कोन वाढणार होता की काय ?   शांत ,  निश्चल पाण्यावर कुणीतरी दगड मारुन  त्याची स्थिरता भंग करावी तसं काहीतरी सावंतांच्या बाबतीत झालेलं होतं .  मी सावंतांकडे पाहिलं . ते अजूनही मोबाईलमधे डोकं घालून बसले होते . त्यांना आपण काय बघतोय ह्याच्याशी सोयर सुतक नव्हतं  कारण मोबाईलवर कॅलेंडर उघडलेलं मला दिसलं . ते वेगळाच विचार करीत असावेत . आणि तो शकुंतला बाईंच्या बाबतीतच असावा हे मात्र निश्चित ...!  पहिल्यांदा मला असं वाटलं की दादर लवकर यावं , कारण आमची ही सगळी प्रजा आपापल्या स्टेशन्सवर   उतरल्याशिवाय सावंत काहीही सांगणार नाहीत . शेवटी सगळे उतरले . मी सावंतांच्या बाजूला जाऊन बसलो .
" सावंत , हे काय आहे ? हे असं कसं काय झालं ? " मी त्यांना विचारलं .
" यार मला पण कळत नाही . तुला मागे बोललो ना की आम्ही एकदा भेटलो होतो म्हणून , त्यानंतर आम्ही आणखी एक दोन  वेळा भेटलो . त्या भेटींमधे  तिने मला तिची कहाणी सांगितली .  तिची कहाणी ऐकशील तर तुझ्या डोळ्यात पाणी येईल .  तिचे मिस्टर आणि मुलगा दोघेही चार वर्षापुर्वी  एका  ऍक्सीडंट मधे वारले .  ती एकटी पडली .  तिच्या नवऱ्याची इस्टेटसुद्धा तिच्या नातेवाईकांनी  तिला  मिळून दिली नाही . तिला फसवुन ती सगळी प्रॉपर्टी त्यांनी लुबाडली . एक वेळ अशी आली होती की तिच्याकडे काहीही उरलं नाही . ती अगदी एकाकी , असहाय झाली ,  त्यामुळे ती शेवटी तिच्या भावाकडे आली . त्याने तिला आता एक नोकरी मिळवून दिली आहे . आधी ती  तिच्या भावाकडे राहात होती  पण तिच्या वहिनीबरोबर रोजच खटके उडायला लागले . तिने तेही घर सोडलं आणि आता एका भाड्याच्या रुममधे एकटीच राहते . यार मध्या , तिने हे मला सांगितलं तेव्हा तर मला एकदम भडभडून आलं ...  आधी जवळचे गेले , नंतर नातेवाईकांनी फसवलं , माहेर म्हणावं  असं  काही राहिलं नाही , काय वाटलं असेल रे तिला  ?  एखाद्या तिर्हाइताबरोबर असं झालं तरी आपल्याला दुःख होतं , इथे तर मी तिच्यावर प्रेम  केलंय यार ... " असं म्हणून सावंतांनी ओंझळीत तोंड झाकलं आणि ते रडु लागले . त्यांना असं लहान मुलासारखं रडताना पाहुन मला काय बोलावं तेच सुचेना . ते तसेच काही वेळ रडत राहिले . मी बाहेर पाहिलं गाडी सी एस टी स्टेशनमधे शिरत होती . मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला .
" सावंत प्लीज शांत व्हा ... तुमची काय चूक आहे हयात ? "
" मला तिच्याबद्दल खुप वाईट वाटतंय रे ..."
" बरोबर आहे ... सहाजिकच आहे ... वाईट वाटणारच... पण आता आपण करणार तरी काय ? "
" तु जर माझ्या जागी असतास तर तू काय केलं असतंस ? " असं बोलून त्यांनी माझी बोलतीच बंद केली . खरंच माझ्या बाबतीत असं झालं असतं तर मी काय केलं असतं ? गाडी बराच वेळ सी एस टी स्टेशनला उभी होती . सगळे उतरुन गेले . आमच्या डब्यात फक्त आम्ही दोघेच राहिलो . गाडी पुन्हा निघणार होती . मी सावंतांना म्हणालो , " चला , आपण उतरुया .... इथेच एक चांगलं रेस्टॉरंट आहे तिथे बसून बोलू .... चला ." मी कसंबसं त्यांना उठवलं .  आम्ही दोघे स्टेशनबाहेरच्या कॅफेत आलो . मी माझा फोन बंद करुन टाकला . जरा उशीर झाला की  ऑफिसचा  बॉस अगदी प्रलय आल्यासारखा फोन करत रहातो. आज सावंत महत्वाचे ! बाकी काही नाही . मी वेटरला दोन चहाची ऑर्डर दिली .  सावंतसुद्धा आता नॉर्मल झाले होते .
" सावंत मला सुद्धा जोशीबाईंबद्दल सहानुभूती वाटते . अशी वेळ कुणावरही येऊ नये . "
"  मला तिच्यासाठी काहीतरी  करायचंय ... मला तिची ही परिस्थिती बघवत नाही रे .... काय करु सांग ना प्लीज ..."  त्यांची ही याचना मला लहान मुलाच्या हट्टासारखी वाटली .
" एक विचारु का सावंत ? ."
" विचार ना ... "
" त्या तुम्हाला काही म्हणाल्या का ? "
"  म्हणजे ? तुला काय म्हणायचंय ? "
" हेच की त्यांना मदतीची गरज आहे , किंवा त्यांना एकटेपणा वगैरे वाटतोय ... "
" तिने तिची कहाणी मला सांगितली , आणि ती रडायलाच लागली .  याचा अर्थ काय ?  ती फार एकटी पडलीय . आपलं म्हणावं  असं ह्या घडीला तिच्याजवळ कोणीही नाही . "
" हम्म्म ... पण मग आता काय करायचं ? तुम्ही काय ठरवलंय ? "
" अरे तेच तर सुचत नाही ना ... . सारखा तिचाच विचार येतोय  डोक्यात ! माझं तर  डोकं फिरायची वेळ आलीय " असं म्हणून ते डोकं धरुन बसले .
" त्यांना आपण दुसरीकडे कुठे शिफ्ट करु शकतो का ? "
" दुसरीकडे म्हणजे कुठे ? "
" वर्किंग वुमन हॉस्टेल ..., किंवा एखादं लेडीज हॉस्टेल ... ? "
" ह्याचा विचार मी पण केला होता  , पण एक दोन  ठिकाणी जागा शिल्लक नाहीत , आणि काही हॉस्टेल फारच महाग आहेत ... आणि जरी आपण हॉस्टेलचा पर्याय निवडला तरी ती तिथे एकटीच राहणार  , आता जशी भाड्याच्या रुममधे रहाते तशीच ...! तिला मानसिक  आधाराची गरज आहे . "
" हम्म ...  तुम्ही शकुंतला बाईंबद्दल घरी सांगितलंय का ? " मी मुख्य प्रश्नाला हात घातला .
" नाही , अजुन तरी नाही . "
" मला आता एकच पर्याय दिसतोय  "
" काय ... काय ...? " त्यांनी अधाशीपणे विचारलं .
" पण माझा पर्याय तुम्हाला परवडणार नाही,  सावंत  . " मी म्हणालो .
" सांग तरी .... परवडेल की नाही ते नंतर बघू ..."

" तुम्ही त्यांना तुमच्या घरी घेऊन जा ... "  मी हे सुचवल्यावर शॉक लागल्यासारखे ते माझ्याकडे पहात राहिले .